धुमसती लंका : रस्त्यावर सैनिक उतरले; भारतात आश्रयास गेल्याची अफवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sri lanka crisis pm mahinda rajapaksa at trincomallee naval base
धुमसती लंका : रस्त्यावर सैनिक उतरले; भारतात आश्रयास गेल्याची अफवा

धुमसती लंका : रस्त्यावर सैनिक उतरले; भारतात आश्रयास गेल्याची अफवा

कोलंबो : आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेची स्थिती बिघडत असून नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लष्कर, हवाई दल आणि नौदलाला पाचारण करण्यात आले आहे. सार्वजनिक मालमत्तेची हानी करणाऱ्या आणि हिंसाचार माजविणाऱ्या व्यक्तीला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले. दरम्यान, श्रीलंकेचे माजी पंतप्रधान ७६ वर्षीय महिंदा राजपक्ष हे भारतात गेल्याचे वृत्त श्रीलंका आणि भारताने खोडून काढले आहे. त्यांना त्रिंकोमाली येथील नौदलाच्या तळावर कुटुंबीयांसह सुरक्षितरित्या ठेवण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाचे सचिव कमल गुणरत्ने यांनी सांगितले.

काल सकाळी माजी पंतप्रधान महिंदा राजपक्ष आणि त्यांचे कुटुंब त्रिकोमाली येथील नौदलाच्या तळावर गेल्यानंतर ते भारतात पळून गेल्याची अफवा पसरली. परंतु अफवा फेटाळून लावत ते श्रीलंकेतच असल्याचे म्हटले आहे. गुणरत्ने यांनी एका डिजिटल वार्तालपात म्हटले की, महिंदा राजपक्ष यांना सुरक्षितरित्या बाहेर काढून त्यांना त्रिंकोमाली नौदलाच्या तळावर ठेवण्यात आले आहे.

ही तर भारतासाठी धोक्याची घंटा : मुफ्ती

श्रीनगर ः श्रीलंकेत आर्थिक संकटामुळे निर्माण झालेले अराजक ही भारतासाठी धोक्याची घंटा आहे. भारत श्रीलंकेच्याच मार्गावर चालत आहे, असा इशारा पीडीपीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटद्वारे दिला. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, की श्रीलंकेतील घडामोडी भारतासाठी धोक्याची घंटा आहे. भारताला २०१४ पासून जातीय उन्माद व काल्पनिक भीतीने ग्रासले आहे. भारत श्रीलंकेच्याच धार्मिक बहुसंख्यवादाच्या मार्गावर चालत आहे.

‘आयएमएफ’ मदत सुरू ठेवणार

आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत सुरूच राहणार आहे. नाणेनिधीने म्हटले की, श्रीलंकेबरोबर तांत्रिक पातळीवर चर्चा सुरूच राहणार असून त्यानुसार नवीन सरकार आल्यानंतर धोरणात्मक निर्णय घेतले जातील. मागच्या बैठकीत आयएमएफने श्रीलंकेला ३०० दशलक्ष डॉलरवरून ६०० दशलक्ष डॉलर मदत करण्याचे आश्‍वासन दिले होते.

भारत लष्कर पाठवणार नाही

श्रीलंकेतील ढासळलेली स्थिती पाहता भारताकडून लष्कर तैनात केले जाणार असल्याची चर्चा सुरू होती. पण भारताने ही चर्चा अफवा असल्याचे म्हटले आहे. भारतीय दूतावासाने म्हटले, की भारताकडून अशी कोणतीही कृती केली जाणार नाही. यापूर्वीच परराष्ट्र मंत्रालयाने देखील हे वृत्त फेटाळून लावले आहे.

भारतात राजपक्ष कुटुंब नाही

श्रीलंकेतील भारतीय दूतावासाने म्हटले की, श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्ष आणि त्यांचे कुटुंब भारतात आलेले नाही. कारण काल महिंदा राजपक्ष आणि त्यांचे कुटुंब भारतात पळून गेल्याची अफवा पसरली होती. ही अफवा निराधार असल्याचे श्रीलंका आणि भारताने स्पष्ट केले.

Web Title: Sri Lanka Crisis Pm Mahinda Rajapaksa At Trincomallee Naval Base

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :global newsSri Lanka
go to top