आश्रय दिलेला नाही; गोटाबाया राजपक्षेंबाबत सिंगापूर सरकारचे स्पष्टीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे

आश्रय दिलेला नाही; गोटाबाया राजपक्षेंबाबत सिंगापूर सरकारचे स्पष्टीकरण

सिंगापूर : श्रीलंकेतील आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडून पळ काढला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना घेऊन जाणारे सौदी एअरलाइन्सचे विमान सिंगापूरच्या चांगी विमानतळावर पोहोचले आहे. या सर्वांनंतर सिंगापूर सरकारकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे.

सिंगापूर परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे खासगी भेटीवर येथे दाखल झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच सिंगापूर सरकारने त्यांना आश्रय दिलेला नसल्याचेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यापूर्वी श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना घेऊन जाणारे विमान मालदीवमध्ये पोहोचले होते. मालदीवमध्ये काही काळ मुक्काम केल्यानंतर त्यांचे विमान सिंगापूरला रवाना झाले. त्यानंतर सिंगापूर सरकारकडून वरील स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

दुसरीकडे, राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या देश सोडण्यात भारत सरकारच्या हस्तक्षेपाच्या बातम्याही समोर आल्या होत्या. परंतु मालदीवमधील भारतीय उच्चायुक्तांनी या वृत्तांचे खंडन केले आहे. मालदीवमधील भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले की, भारत सरकारने श्रीलंकेचे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना मालदीवमधून बाहेर काढण्यास मदत केल्याचे वृत्त निराधार आहे.

श्रीलंकेतील परिस्थीती हाताबाहेर

आर्थिक संकटातून जात असलेल्या श्रीलंकेत राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलकांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनावर कब्जा करत गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याआधी गोटाबाया राजपक्षे यांनी 13 जुलै रोजी पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते. परंतु अद्यापपर्यंत याची औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. यात आता गोटाबाया राजपक्षेंनी देशातून पळ काढल्याने त्यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Web Title: Sri Lanka Crisis Singapore Foreign Ministry Statement On President Gotabaya Rajapaksa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..