'या' देशात फिरायला जाताय? मग सनस्क्रीम नेता येणार नाही, कारण...

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 जानेवारी 2020

सूर्याच्या किरणापासून मानवी त्वचेचा बचाव करणाऱ्या सनक्रीमवर बंदी घालणारा पलाऊ हा पहिला देश ठरला आहे. 

गेरुलमुड  - समुद्री जीवन आणि प्रवाळांना हानिकारक ठरणारे सनक्रीम आणि मलम लावण्यास किंवा वापरण्यास पलाऊ देशात एक जानेवारी २०२० पासून मनाई करण्यात आली आहे. सूर्याच्या किरणापासून मानवी त्वचेचा बचाव करणाऱ्या सनक्रीमवर बंदी घालणारा पलाऊ हा पहिला देश ठरला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सनक्रीममध्ये असलेल्या रासायनिक घटकांमुळे प्रवाळांची मोठी हानी होत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. शास्त्रज्ञांच्या संशोधनानंतर प्रशांत महासागरात असलेल्या पलाऊ देशाने सनक्रीम वापरण्यावर निर्बंध घातले. या निर्णयाची अंमलबजावणी नवीन वर्षापासून सुरू झाली असून, यासंदर्भात पलाऊचे अध्यक्ष टॉमी रेमेनगेसाऊ यांनी म्हटले की, पर्यावरण हे जीवनाचे घरटे आहे. त्यामुळे पर्यावरणाचा आपल्याला पर्यावरणात राहण्यासाठी त्याचा आदर करावा लागेल. योग्यवेळी निर्णय घेतल्याचे अध्यक्षांनी म्हटले आहे. या निर्णयामागे दोन वर्षांपूर्वीचा अहवाल कारणीभूत आहे. युनेस्कोने पलाऊ देशाच्या प्रवाळाचे जागतिक वारशात समावेश केला असून, या प्रवाळात सनक्रीमचे घटक मोठ्या प्रमाणात आढळून आले होते. त्यामुळे २०२० पासून सनक्रीमवर बंदीचा निर्णय घेतला.  अमेरिकेच्या हवाई बेटानेही सनक्रीम वापरण्यावर बंदी घातली असून, हा निर्णय २०२१ पासून अंमलात येणार आहे. 

बंदीमागील कारणे
हवामान बदलामुळे जगभरातील प्रवाळांवर विपरित परिणाम झाला आहे. यासंदर्भातील पुरावेदेखील आढळून आले आहेत. सनक्रीममध्ये अनेक रासायनिक घटक असून, ते वेगवेगळ्या माध्यमातून सागरात प्रवेश करतात. सनक्रीममधील घटक प्रवाळांवर मारक ठरत आहेत.
दरवर्षी महासागरात सुमारे १४ हजार टन सनक्रीम टाकून दिले जाते. 
प्रवाळातील हार्मोनल सिस्टीममध्ये सनक्रीम हस्तक्षेप करतात आणि परिणामी मत्स्य प्रजननावरही त्याचा विपरित परिणाम होत असल्याचे विविध अभ्यासात आढळून आले आहे. 
२०१५ च्या एका अभ्यासात सनक्रीममध्ये असलेले ‘ऑक्‍सिबेजोन’ घटक हे प्रवाळाच्या वृद्धीला रोखण्याचे काम करते. सनक्रिममधील विषारी रसायनांचे अंश पलाऊमधील सागरी जीवांच्या पेशीत आढळले आहेत.

कारवाईचे स्वरूप
सरकारच्या निर्णयानंतर देशात प्रवेश करणाऱ्या पर्यटकाकडे सनक्रीम आढळून आल्यास ते जप्त केले जाईल. तसेच एखाद्या ठोक व्यापाऱ्याने त्याची विक्री केल्यास त्यास १ हजार डॉलरपर्यंत दंड आकारला  जाऊ शकतो.

पलाऊबाबत 
प्रशांत महासागरात असलेल्या पलाऊ देश फिलिपिन्सच्या पूर्वेला ८०० किलोमीटर, तर जपानच्या दक्षिणेला ३२०० किलोमीटर अंतरावर आहे.
१९९४ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाकडून पलाऊ देशाला स्वातंत्र्याची मान्यता देण्यात आली आणि जगातील सर्वांत नवीन स्वतंत्र देशांपैकी एक आहे. 
देशाची लोकसंख्या सुमारे २० हजार आहे. या देशात इंग्लिश, पलाऊन, जपानी भाषा बोलली जाते.
पलाऊ हा पॅसेफिक महासागरात मायक्रोनेशिया क्षेत्रात एक लहान बेटांचा देश आहे. तसेच ५०० हून अधिक बेटांचा द्वीपसमूह आहे.
कोरोर बेटाला कोरोर या नावानेही ओळखले जाते. ही पलाऊची जुनी राजधानी आणि बेटांचे आर्थिक केंद्र आहे.
सध्या बाबेल्डाओब ही राजधानी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunscreen will not be a leader in this country