esakal | दोन देश विविधता अनेक
sakal

बोलून बातमी शोधा

 London to Boston

कोविडची त्रासदी, दीड वर्षापेक्षा जास्त काळात सामाजिक काळोख पसरला व महामारीचा उद्रेक. इतिहासाच्या पानात फक्त मृतांचा हैदोस वाचायला मिळाला, पण ते या वयात पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं. बोस्टन ते लंडन असा प्रवास करताना कोविडची सरकारमान्य जबाबदारी, नियम पाळत दोन खंडाचा आढावा घेत पोहोचलो तेव्हाची गोष्ट...

दोन देश विविधता अनेक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- डॉ. सूरज एंगडे

जगाचा पुढारी या नात्याने अमेरिकेने आपल्या नागरिकांना लस देऊन मोकळे केले. युरोपात मात्र पहिली लस देऊन झाली. लंडनमध्ये जास्त वेळ राहण्याची इच्छा नव्हती म्हणून उत्तरेकडे पाहिले. स्कँडेवेनिया राष्ट्रांची अनेक उदाहरणं ऐकून होतो. त्यांची प्रगती, सामाजिक जबाबदारी, हॅपिनेस इंडेक्स वगैरे... मग काय नार्वे या राष्ट्रातील एका जुन्या मैत्रिणीचे खुले निमंत्रण होते; पण कोविड काळ, सहज जाता येणे अतिशय अवघड. नियम दररोज बदलतात. विमान कंपनीनेदेखील हात टेकले. त्यांच्या संकेतस्थळावर गेले, की नॉर्वे सरकारच्या परराष्ट्रीय संकेतस्थळाची माहिती, जाण्याचा प्लॅन तसा प्रतीक्षेतच राहिला.

काही महिन्यांपूर्वी माझी मैत्रीण सारा हिचा मेसेज आला ‘‘नियम बदलत आहेत. तुला आता इथे येणे शक्य होईल.’’ तिने काही संकेतस्थळाची माहिती पाठवली. त्यामध्ये विशेष प्रवर्गाच्या लोकांसाठी परवानगी दिली होती; मात्र त्यातील एकाही अटी-शर्तीत मी बसत नव्हतो. आता कसं करायचं? सारा म्हणाली, ‘‘काळजी करू नकोस, मी एक पत्र पाठवते व त्या सरकारी संकेतस्थळावर माझी माहिती देते.’’ काही तासांच्या अवधीत परवानगी मंजूर झाली. विजा आधीच घेतलेला होता. फक्त तिकीट काढायची व कोविडच्या टेस्ट करायच्या.

एकेकाळी आंतरराष्ट्रीय प्रवास करणं माझ्यासाठी सोपं होतं; मात्र दीड वर्षाच्या कोविडने जगाचे नियमच बदलले. त्यामुळे मनात थोडी भीती होतीच. सुदैवाने मला लंडन ते बर्गेन एक डायरेक्ट फ्लाईट मिळाली. सर्व चौकशा व कागदपत्रांची तपासणी केल्यावर विमानात बसू दिले. विमानात सतरा प्रवासी होते. एखाद्या सहलीला जात असलेल्या परिवारिक गाडीप्रमाणे वातावरण होते. नॉर्वेला आगमन होताच जे पत्र हवं होतं ते मिळत नव्हतं म्हणून अखेर साराला कॉल करून ते पत्र मागवून घेतलं.

लंडन आणि नॉर्वेचे अंतर केवळ दीड तासांचे, पण समुद्र पार करून गेल्यावर चित्र बदलतं. इथली लोकं दिसायला वेगळी, रंग गोरा, पण नॉर्वेच्या लोकांचा गडद गोरा रंग होता. त्यांचे केस सोनेरी व भाषा नॉर्वेजियन... जसे ऐकले होते तसे दिसले. विमानतळावरच कोविड चाचणीकरिता एक बूथ होते. रांगेत उभे असताना तिथल्या सेक्युरिटीमध्ये मला एक कृष्णवर्णीय युवक दिसला. स्मित हास्य देत त्याने माझे स्वागत केले. विक्टर असे त्या युवकाचे नाव. त्याला चार भाषांचं अप्रतिम ज्ञान होतं.

विक्टरचे आई-वडील सोमालिया या देशात जन्मले होते; मात्र विक्टरचा जन्म नॉर्वेमध्ये झाला होता. त्याच्या तोंडून इंग्रजी व नॉर्वेजियन भाषा ऐकणे हा एक कृतिशील अनुभव होता. कॉस्मोपोलिटीनिझम काय असते त्याची हलकीशी झलक मिळाली.

बर्गेन हे पश्चिम विभागातील अनेक बेटांच्या मध्यस्थ डोंगरांच्या मध्ये वसलेलं शहर. ट्राममध्ये प्रवास करताना, मास्क लावलेला कदाचित मी एकटाच प्रवासी होतो. इथले लोक मास्क वापरत नाहीत. हे मला अल्पावधीत लक्षात आले. त्यामागचे सामाजिक कारण शोधण्याचा मी प्रयत्न केला, त्या वेळी मला असे सांगण्यात आले, की एका वेळी बर्गेनमध्ये कोविड बाबतीत लॉकडाऊनसारखी परिस्थिती होती, मात्र अख्ख्या जगामध्ये कोविडची जी परिस्थिती होती, तसली आणीबाणी बर्गेनमध्ये नक्कीच नव्हती.

दोन दिवसांनी मला नॉर्वेच्या एका सरकारी कर्मचाऱ्याचा फोन आला. अगदी मोहक व प्रेमळ भाषेत त्याने माझ्या तब्येतीबद्दल विचारपूस केली. त्यानंतर मी कोविड संदर्भातील नियमाचे पालन करतो की नाही याची चौकशी केली. एखाद्या काळजी घेणाऱ्या मित्रासारखे आमचे संभाषण झाले. त्या कर्मचाऱ्याने मला डोंगरात फिरण्याचा सल्ला दिला.जो देश नागरिकांकडून भक्कम कर उकळतो व महत्त्वाच्या विभागांमध्ये शासकीय हस्तक्षेप करतो, त्या देशाने आपले नागरिक कुठल्या जबाबदारीने ठेवायला हवे होते, याचा उत्तम नमुना नॉर्वे हा देश आहे. शिक्षण, आरोग्य या सरकारच्या जबाबदाऱ्या आहेत म्हणून काळजी घेणारे लोकदेखील आहेत; मात्र इथे त्याकडे फायदा म्हणून न बघणारे डॉक्टर्स, नर्स आहेत. इथिकल आणि मॉरल जबाबदारीची शपथ घेतलेले कर्मचारी आपली जबाबदारी निष्ठेने पाळत होते.

दुसरीकडे भारतात ऐन कोविड संकटातून बक्कळ पैसे कमावलेले अनेक उद्योजक आपणाला भेटतील. वेळप्रसंग आला तर देशातून पहिले पळ काढणारे हेच ते अतिश्रीमंत लोक असतील. भारतीय समाजात जाती व्यवस्थेने जो दुरावा निर्माण केला, त्यापुढे जाऊन भांडवलशाहीने दोन टोकीय समाज करून एक भीतीदायक देश निर्माण केला. नियंत्रित भांडवली व्यवस्थेचे उत्तम उदाहरण म्हणून नार्वेकडे पाहता येईल. इथले लोक सामाजिक विषयाकडे अंत्यत जबाबदारीने बघतात. भारतात कोविड लसीचे उत्पादन बाहेरच्या देशासाठी होतंय आणि जनता मात्र गंगेत प्रवाहित होत आहे. सरकारने लशी वाटल्या व राष्ट्रसंघात त्याचे समर्थनही केले. शेवटी दोन देश अनेक विविधता...

surajyengde@fas.harvard.edu

(लेखक जगातील आघाडीचे संशोधक आणि विचारवंत असून, ‘कास्ट मॅटर्स’ या बेस्ट सेलर पुस्तकाचे लेखक आहेत. व्याख्याने, सेमिनारच्या निमित्ताने जग अनुभवतात. ‘जी क्यु’ या मॅगझीनने भारताच्या २५ प्रभावशाली तरुणामध्ये त्यांची निवड केली आहे.)

loading image