
आपले भवितव्य आपल्याच हाती ठेवा
बीजिंग : प्रत्येकाने इतर देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करावा, असे आवाहन चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आज आशियातील देशांना केले. तसेच, ‘आपले भविष्य आपल्याच हातात राहू द्या,’ असे म्हणत जिनपिंग यांनी जागतिक सुरक्षा यंत्रणेचा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवला. हिंद-प्रशांत क्षेत्रात अमेरिका आपले सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न करत असल्याने चीनने अमेरिकेवर अनुल्लेखाने टीका केल्याचे मानले जात आहे.
आशिया परिषदेच्या बाओआ फोरमच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात व्हिडिओ लिंकद्वारे सहभागी झालेल्या जिनपिंग यांनी जागतिक सुरक्षेसाठी सहा मुद्द्यांचा एक प्रस्ताव मांडला. युक्रेनने नाटो संघटनेत सहभागी होण्यास रशियाने स्वत:च्या सुरक्षेच्या कारणास्तव विरोध करत युद्धाचा मार्ग स्वीकारला, त्याचे एकप्रकारे समर्थनच जिनपिंग यांनी केले आहे. जिनपिंग म्हणाले की,‘प्रत्येक देशाने इतरांच्या सार्वभौमत्त्वाचा आदर करावा आणि इतरांच्या अंतर्गत घडामोडींमध्ये हस्तक्षेप करू नये.
इतर देशांनी सामाजिक यंत्रणेचा आणि विकासाचा जो मार्ग स्वीकारला आहे, त्याचाही आदर करावा. आपल्या सुरक्षेची काळजी घेण्याचा प्रत्येक देशाला अधिकार आहे. त्यामुळे समतोल, परिणामकारक आणि शाश्वत सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न व्हावेत. आपल्या सुरक्षेसाठी दुसऱ्याची सुरक्षा धोक्यात घालण्याच्या प्रयत्नांना विरोध व्हावा. प्रत्येक देशाने आपले भविष्य आपल्याच हातात ठेवावे.’
जगातील सर्व देश हे एकाच जहाजावर असलेल्या प्रवाशांसारखे आहेत. वादळातून जहाजाला बाहेर काढण्यासाठी प्रवाशांची एकजूट असणे आवश्यक आहे. एका प्रवाशाला सर्वांनी बाहेर फेकून देण्याचा विचार मान्य नाही.
- शी जिनपिंग, अध्यक्ष, चीन
जिनपिंग म्हणाले...
वाद शांततेच्या मार्गाने सोडवावेत
दुटप्पीपणाला विरोध करावा
एकतर्फी निर्बंधांना विरोध करावा
Web Title: Take Control Your Future Appeal Asian Countries Beijing Chinese President Xi Jinping
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..