ॲस्ट्राझेनेका लसीच्या अंतिम चाचण्या स्थगित

वृत्तसंस्था
Thursday, 10 September 2020

गेल्या महिन्यात ॲस्ट्राझेनेकाने लसीच्या व्यापक चाचण्यांसाठी अमेरिकेत ३० हजार लोकांची निवड करण्यास सुरुवात केली होती. ब्रिटनमधील लोकांनाही ही लस टोचण्यात आली आहे.

न्यूयॉर्क - कोरोना व्हायरसच्या साथीचा जगभरात उद्रेक झाला असताना सर्वांचे लक्ष लसीकडे लागले आहे. अशा वेळी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने तयार होत असलेल्या लसीच्या अंतिम टप्प्यातील चाचण्या तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्याचे ॲस्ट्राझेनेकाच्या कंपनीने मंगळवारी (ता. ८) जाहीर केले. 

कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चाचण्यांदरम्यान लस दिलेली एक स्वयंसेवक अचानक आजारी पडल्याने आम्ही चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ही एक सामान्य घटना आहे. लसीच्या डोसाचा दुष्परिणाम म्हणून या व्यक्तीला त्रास झाला का, याची चौकशी सुरू आहे. तसेच, लसीच्या सुरक्षिततेची तपासणी करण्यासाठी चाचणीला स्थगिती दिली असून, त्याचे निष्कर्ष आल्यानंतर चाचण्या पुढे सुरू करण्यात येईल. मात्र, या लसीच्या संभाव्य दुष्परिणामांची माहिती ॲस्ट्राझेनेकाने दिलेली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ब्रिटनमध्येही चाचण्या
‘स्टेट’ या आरोग्यविषयक वृत्तस्थळाने चाचण्या थांबविल्याचे वृत्त प्रथम दिले. ब्रिटनमध्ये लसीचे संभाव्य दुष्परिणाम दिसून आल्याचे या वृत्तात म्हटले आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने याला दुजोरा दिला असून, अमेरिकेत आणि अन्य देशांत अभ्यासासाठी लसीच्या चाचण्या स्थगित केल्याचे स्पष्ट केले. गेल्या महिन्यात ॲस्ट्राझेनेकाने लसीच्या व्यापक चाचण्यांसाठी अमेरिकेत ३० हजार लोकांची निवड करण्यास सुरुवात केली होती. ब्रिटनमधील लोकांनाही ही लस टोचण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतही काही प्रमाणात अभ्यास सुरू आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अन्य लशींवर परिणाम?
‘स्टेट’च्या वृत्तानुसार लशीबद्दल प्रतिकूल मते कधी आली आणि या सर्व घटनेबद्दल अधिक माहिती मिळालेली नाही. पण ज्या स्वयंसेवकांना ही लस दिली आहे, त्यांच्यात सुधारणा होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ॲस्ट्राझेनेकाच्या लशीची चाचणी थांबविण्याच्या निर्णयाने अन्य लशींच्या चाचण्यांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच अन्य लशींच्या निर्मात्यांकडून केल्या जात असलेल्या लशीच्या वैद्यकीय चाचण्याही अडचणीत येऊ शकतात. 

अन्य लस निर्माते सावध
अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोनावर नऊ लशी विकसित होत आहे. ॲस्ट्राझेनेका लशीच्या चाचणीमध्ये अडथळा आल्यानंतर या लशींचे निर्माते सावध झाले आहेत. कोरोनाच्या साथीला प्रतिबंध घालण्यासाठी लस निर्मिती अत्यावश्‍यक असली तरी लशीच्या प्रायोगिक तत्त्वावरील चाचण्यांसाठी आवश्‍यक शास्त्रीय सुरक्षा आणि परिणामांच्या मानकांचे पालन करण्याचा निश्‍चय लस निर्मात्यांनी केला आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ॲस्ट्राझेनेकाचा प्रवक्ता म्हणाला...
मोठ्या प्रमाणावरील चाचण्यांमध्ये त्रास होण्याची शक्यता
विपरीत परिणामांची स्वतंत्रपणे मीमांसा आवश्‍यक
लसीचे गंभीर परिणाम वेगवेगळ्या स्वरूपात उद्‌भवू शकतात
रुग्णालयात दाखल होणे, गंभीर आजार जडणे आणि मृत्यूचा धोका यांचाही यात समावेश होऊ शकतो.

इंग्लंडमधील ॲस्ट्राझेनेका या कोरोनाच्या लसीच्या चाचण्यांवर आम्ही भाष्य करू शकत नाही. परंतु, त्यांनी पुनरावलोकनासाठी चाचण्या थांबविल्या आहेत आणि लवकरच पुन्हा ही प्रक्रिया सुरू होण्याची आशा आहे. भारतातील चाचण्या सुरूच राहतील.
- सिरम इन्स्टिट्यूट, पुणे.

सिरमला कारणे दाखवा नोटीस
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने कोरोनावरील  लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला देशाच्या औषध नियंत्रकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ब्रिटनमधील एका रुग्णामध्ये काही विपरीत लक्षणे दिसून आल्यानंतर या लसीच्या चार देशांतील चाचण्या थांबविण्यात आल्या आहेत असे असताना देखील सिरम या चाचण्या का घेत आहे? या संस्थेने अमेरिकेतील रुग्णांबाबतचा अहवाल आमच्याकडे अद्याप का पाठविलेला नाही? अशी विचारणा या नोटिशीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुढील आठवड्यातच सिरमच्या या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल पार पडणार होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tests of AstraZeneca coronavirus vaccine postponed