
लंडन - पर्यावरण बदलामुळे भारत आणि पाकिस्तानात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता शंभर पटींनी अधिक वाढली असल्याचा इशारा ब्रिटनच्या हवामान विभागाने दिला आहे. वातावरणातील या बदलामुळे नैसर्गिक आपत्तींची तीव्रता आणि वारंवारताही वाढणार असल्याचा अंदाज या विभागाने व्यक्त केला आहे.
ब्रिटनच्या हवामान विभागाने काल हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, तापमानात प्रचंड वाढ होण्याची जी घटना पूर्वी तीन शतकांमधून एकदा घडत होती, ती आता तीन वर्षांमधून एकदा घडेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. २०१० साली एप्रिल आणि मे महिन्यांत नोंदविले गेलेले तापमान १९०० सालानंतरचे या दोन महिन्यांतील सर्वाधिक होते. २०१० मध्ये घडलेली तापमानवाढीची घटना ३१२ वर्षांनंतर झाली होती. आता मात्र, दर ३.१ वर्षांनी वातावरणात बदल होण्याची शक्यता असून दर १.१५ वर्षांनी उष्णतेच्या लाटा वाढण्याची शक्यता वाढणार आहे.
पाकिस्तानमध्ये गेल्या रविवारी ५१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या काही दिवसांत पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतातही तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे या दोन्ही देशांत उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता शंभर पटींनी वाढली आहे, असे ब्रिटनच्या हवामान विभागाने म्हटले आहे.