चीनमध्ये ‘कोरोनाव्हायरस’चा तिसरा बळी

पीटीआय
मंगळवार, 21 जानेवारी 2020

चीनमध्ये ‘सार्स’ (सिव्हर ॲक्‍युट रेस्पिरेटरी सिन्ड्रोम) सारख्या कोरोनाव्हायरस विषाणूचा प्रसार वेगाने होत असून, त्याची लागण होऊन मृत्यू झाल्याच्या तिसऱ्या घटनेची नोंद झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.

बीजिंग - चीनमध्ये ‘सार्स’ (सिव्हर ॲक्‍युट रेस्पिरेटरी सिन्ड्रोम) सारख्या कोरोनाव्हायरस विषाणूचा प्रसार वेगाने होत असून, त्याची लागण होऊन मृत्यू झाल्याच्या तिसऱ्या घटनेची नोंद झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले. या विषाणूचा प्रसार झालेला चीन हा आशियामधील तिसरा देश आहे, असे सांगण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चीनमध्ये पुढील आठवड्यात नवे वार्षिक चांद्रवर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त देशभरात हजारो नागरिक कुटुंबासह फिरायला जातात. या विषाणूमुळे त्यांच्या मनात भीती निर्माण होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. या नव्या संसर्गजन्य माध्यमाला शास्त्रज्ञांनी ‘कोरोनाव्हायरस’ असे नाव दिले आहे. काही विशेष विषाणूंचा हा गट असून, त्यापासून साधा ताप येण्यापासून श्‍वसनाला अडथळे येणे आणि आतड्यांसंबंधी विकार होतात. 

‘कोरोनाव्हायरस’चे अस्तित्व प्रथम मध्य चीनमधील वुहान या शहरात आढळले. याचा संबंध ‘सार्स’शी असल्याचे तो धोकादायक मानला जातो. २००२ -२००३ मध्ये या विषाणूमुळे चीन आणि हाँगकाँगमध्ये तब्बल ६५० जणांचा बळी गेला होता. वुहानची लोकसंख्या सुमारे एक कोटी दहा लाख असून, वाहतुकीचे प्रमुख केंद्र आहे. वार्षिक चांद्रयान वर्षाच्या प्रारंभी हजारो चिनी नागरिक नातेवाइकांना भेटण्यासाठी देशभर प्रवास करीत असतात. त्या वेळी प्रवासासाठी वुहानमध्ये मोठी गर्दी असते. मात्र, यंदा ‘सार्स’च्या भीतीचा पगडा प्रवाशांवर असेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरिया, जपानमध्येही संसर्ग
‘सार्स’च्या संसर्गाने चीनमध्ये तिसऱ्या रुग्णाचे निधन झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. याचा संसर्ग झालेले १३६ रुग्ण वुहानमध्ये एका आठवड्यात आढळले, अशी माहिती स्थानिक आरोग्य आयोगाने दिली. यामुळे चीनमध्ये या विषाणूने ग्रस्त असलेल्यांची संख्या २०१ झाली आहे. वुहानमधून दक्षिण कोरियात आलेल्या ३५ वर्षांच्या महिलेला या विषाणूची लागण झाली. द. कोरियातील ‘सार्स’चा हा पहिला रुग्ण आहे. थायलंड, जपानमध्ये प्रत्येकी तीन रुग्ण आढळले आहेत. हे तिघेही वुहानमधून त्या देशांमध्ये गेले असल्याचे तेथील प्रशासनाने स्पष्ट केले.

भारतीय शिक्षिकेलाही लागण
‘सार्स’चा संसर्ग हा मानवाकडून मानवात होतो, याबद्दल ठोस पुरावे आढळले नसले तरी, ही शक्‍यता नाकारता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी यापूर्वी सांगितले होते. हुवानमधून आलेल्या दोन रुग्णांना या विषाणूशी संबंधित असलेल्या न्यूमोनियाची लागण झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. चीनमध्ये वेगाणे प्रसारीत होणाऱ्या ‘सार्स’सारख्या (सिव्हर ॲक्‍युट रेस्पिरेटरी सिन्ड्रोम) गूढ विषाणूचा प्रसार वेगाने होत असून प्रीती माहेश्‍वरी ही या आजाराची लागण झालेली चीनमधील पहिली विदेशी व्यक्ती ठरली आहे. प्रीती माहेश्‍वरी (वय ४५) या चीनमधील शेंझान प्रांतातील एका आंतरराष्ट्रीय विद्यालयात शिक्षिका असून त्यांना शुक्रवारी येथील एका स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चीनमध्ये प्रादुर्भाव
३ - आतापर्यंतचे मृत्यू
१३६ - नवे रुग्ण
२०१- एकूण रुग्ण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The third victim of coronavirus in China