तुलसी गबार्ड यांची गुगलला नोटीस

वृत्तसंस्था
शनिवार, 27 जुलै 2019

गुगल जर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असेल, तर हा निश्‍चित आमच्या लोकशाहीला धोका आहे.

वॉशिंग्टन : अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली म्हणून डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्या तुलसी गबार्ड यांनी गुगलला 500 कोटी डॉलरची नोटीस बजावली आहे. गुगलने सहा तासांसाठी प्रचाराचे अकाउंट बंद केल्यामुळे त्यांच्या सोशल मीडियावर प्रचारावर परिणाम झाला, असा आरोप गबार्ड यांनी केला आहे. 

गबार्ड या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. त्यांचे अकाउंट 27 आणि 28 जूनदरम्यान सहा तासांसाठी बंद करण्यात आले होते. यामुळे जाहिराती मिळविण्यास आणि मतदात्यांपर्यंत पोहोचण्यास गबार्ड यांना अडचण आली. 'गुगलने माझ्यासोबत भेदभाव केला असून, माझ्या प्रचारावर गुगलच्या निर्बंधांचा परिणाम झाला आहे,' असे मत गबार्ड यांनी व्यक्त केले आहे.

'गुगल जर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असेल, तर हा निश्‍चित आमच्या लोकशाहीला धोका आहे. अमेरिकी नागरिकांच्या हक्कांसाठी गुगलविरोधात लढेन,' असेही गबार्ड यांनी स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tulsi Gabbard notices to Google