Turkey-Syria Earthquakes : देव तारी, त्याला कोण मारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Turkey-Syria Earthquakes death over 19 thousand rescue emergency squad

Turkey-Syria Earthquakes : देव तारी, त्याला कोण मारी

इस्तंबूल : तुर्की आणि सिरियाला भूकंपाचे धक्के बसून तीन दिवस उलटून गेले आहेत. विनाशाच्या गर्तेतही बचाव पथकाचे जवान आणि स्वयंसेवक देवदूत बनून सक्रिय आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे देव तारी, त्याला कोण मारी याची प्रचिती येत आहे.

अंताक्या शहरात आपत्कालीन पथकाने आधी हॅझेल गुनर या तरुण मुलीला वाचविले. त्यानंतर दोन तासांनी तिचे पिता सोनेर यांचा जीव वाचविण्यात त्यांना यश आले. सोनेर यांना रुग्णवाहिकेत बसविण्याची तयारी सुरु असतानाच पथकातील एका सदस्यांनी त्यांना सांगितले की तुमची मुलगी जिवंत आहे आणि उपचारासाठी तिला ज्या रुग्णालयात दाखल केले आहे तेथेच तुम्हाला घेऊन जात आहोत.

त्यावर सोनेर यांनी खोल गेलेला स्वर जीव एकवटून काढला आणि म्हणाले की, मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो! अंताक्याच्या पूर्वेला दियार्बाकीर नावाचे गाव आहे. तेथे ढिगाऱ्याखालून एका महिलेला बाहेर काढण्यात आले. ढिगारा उपसला असता तिच्याच बाजूला तीन मृतदेह आढळून आले.

निराशेतही किरण आशेचे

अंताक्यामध्ये कोसळलेल्या इमारतींसमोर रहिवासी एकत्र येऊन रात्र जागवीत आहेत. ढिगाऱ्यांसमोर ते शेकोटी पेटवितात आणि अंगावर ब्लँकेट गुंडाळून त्यासमोर बसतात. आजूबाजूला निराशेचे वातावरण असले तरी त्यांच्या मनात आशेचे किरण आहेत.

सेराप अर्सलान नावाची ४५ वर्षीय महिला म्हणाली की, जवळच्या इमारतींखाली अजूनही अनेक लोक अडकले आहेत, ज्यात माझी आई आणि भाऊ सुद्धा आहे. सिमेंटचे मोठे तुकडे बाजूला काढण्यासाठी यंत्रसामग्री उपलब्ध होईपर्यंत बुधवार उजाडला.

आम्ही आमच्या परीने प्रयत्न केले, पण त्यास मर्यादा आल्या, सेरेन एकीमेन नावाच्या युवतीने गालावर ओघळणारे अश्रू हातमोज्यांनी पुसले. आई-वडील आणि भाऊ अजूनही ढिगाऱ्याखाली आहेत हे सांगताना ती भावविवश झाली होती. तीन दिवस झाले त्यांचा आवाज ऐकलेला नाही, असे तिचे शब्द काळीज चर्र करणारे ठरले. देशात अनेक ठिकाणी असे खचविणारे चित्र असले तरी विविध देशांच्या मदतपथकांमुळे आशेला अजूनही वाव आहे.

पहिले ७२ तास महत्त्वाचे

भूकंपानंतर ढिगाऱ्याखाली सापडलेल्या व्यक्तींचा जीव वाचविण्यासाठी पहिले ७२ तास महत्त्वाचे असतात. याविषयी इंग्लंडमधील नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठाचे नैसर्गिक संकट विषयातील तज्ज्ञ स्टीव्हन गॉडबी यांनी सांगितले की, बचावण्याची टक्केवारी पहिल्या २४ तासांच्या आत ७४ टक्के इतकी असते. ७२ तासांनी ती २२ टक्के असते. पाचव्या दिवशी हेच प्रमाण केवळ सहा टक्के असते.

मृतांची संख्या १९ हजारांवर; अथक प्रयत्न सुरू

तु र्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे पडलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न वेगाने सुरु आहेत. मात्र, भूकंपाला तीन दिवस उलटून गेल्याने ढिगाऱ्यांखालून कोणी जिवंत बाहेर येण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. भूकंपातील बळींची संख्या आता १९,४०० च्या वर गेली आहे.

तुर्की आणि सीरियामध्ये जगभरातून मदत साहित्य येत आहे. शिवाय, मदत आणि बचाव पथके, वैद्यकीय पथके, श्‍वान पथके, अभियंते असे अनेक तज्ज्ञ येथे मदतीसाठी आले आहेत. मोठ्या यंत्रांच्या साह्याने इमारतींचे पडलेले सांगाडे दूर करण्याचे काम केले जात आहे.

मात्र, ढिगाऱ्यांखाली माणसे असण्याची शक्यता असल्याने वेगाला मर्यादा आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भूकंपानंतरचे ७२ तास हे ढिगाऱ्यांखाली अडकलेल्यांचा जीव वाचविण्यासाठी महत्त्वपूर्ण असतात. ही वेळ टळून गेली आहे. मात्र, अद्यापही काही जणांचा जीव वाचविता येईल, या आशेने बचावपथके रात्रंदिवस काम करत आहेत.

भूकंपामुळे तुर्कीमध्ये सर्वाधिक नुकसान झाले असून येथे १५,३०० जणांहून अधिक जणांचे मृतदेह आढळले आहेत, तर ६० हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. सीरियामध्ये ४,१६२ जणांचा मृत्यू झाला असून पाच हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. भूकंप झालेल्या भागांमधील हजारो लोक बेघर झाले आहेत.