
ट्विटर वापरण्यासाठी लागणार पैसे, इलॉन मस्क यांची मोठी घोषणा
मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरची मालकी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त इलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे आहे. ट्विटरचे करोडो युजर्स आहेत. पण, आता ट्विटर विकत घेतल्यानंतर मस्क यांनी मोठी घोषणा केली आहे. आता ट्विटरची सेवा मोफत मिळणार नसून त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. इलॉन मस्क यांनी आज सकाळीच ट्विट करून माहिती दिली.
हेही वाचा: Twitter नंतर Coca Cola कडे मोर्चा, एलॉन मस्क यांची नवी घोषणा
इलॉन मस्क आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ''सर्वसाधारण युजर्ससाठी ट्विटर नेहमीच मोफत असेल. पण, व्यावसायिक आणि सरकारी कामासाठी ट्विटरचा वापर होत असेल तर त्यांच्यासाठी ट्विटरची सेवा अधिक महाग होणार आहे. लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल''
मस्क यांनी ट्विटरमधील ९.२ टक्के हिस्सा खरेदी केला होता. ते ट्विटरचे सर्वात मोठे भागधार होते. त्यानंतर मस्क ट्विटर खरेदी करणार अशी चर्चा रंगली होती. त्यांनी गेल्या १४ एप्रिल रोजी ट्विटर खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर ट्विटरच्या संचालक मंडळाने इलॉन मस्क यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून मस्क यांनी ४४ अब्ज डॉलरमध्ये ट्विटर विकत घेतले. त्यामध्ये मस्क आमूलाग्र बदल करण्याची शक्यता आहे. युजर्सचा ट्विटरवर विश्वास वाढावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे इलॉन मस्क यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. तसेच नवीन फिचर्स देखील आणले जाणार आहे. कोणत्याही लोकशाहीत काम करण्यासाठी भाषण स्वातंत्र्य खूप महत्त्वाचे आहे. ट्विटर आणखी चांगल्या नवीन वैशिष्ट्यांसह विकसित करायचे आहे, असंही त्यांनी सांगितलं होतं.
ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना देखील बदलण्याची शक्यता आहे. कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल आणि पॉलिसी प्रमुख विजय गडदे यांना हटविण्याची शक्यता आहे. मस्क सध्या नवीन सीईओच्या शोधात असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आपल्या नोकरीवर गदा येणार का? अशी भीती ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना आहे.
Web Title: Twitter Costly For Commercial And Government User Says Elon Musk
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..