Twitter : नोकरकपातीचे मस्क यांच्याकडून समर्थन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk

Twitter : नोकरकपातीचे मस्क यांच्याकडून समर्थन

न्यूयॉर्क : भारतासह जगभरातील विविध ठिकाणच्या ट्विटर कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आल्यावरून सर्वत्र जोरदार टीका होत असताना, या कंपनीचे नवे मालक एलॉन मस्क यांनी आपल्या या निर्णयाचे जोरदार समर्थन केले आहे.

कंपनीला दिवसाला चाळीस लाख डॉलरपेक्षा जास्त तोटा होत असताना नोकर कपातीशिवाय पर्याय नाही, असे ट्विट करत मस्क यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. मस्क यांनी पुरेशी कल्पना न देता कामावरून काढून टाकल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी सॅनफ्रान्सिस्को फेडरल न्यायालयात खटला दाखल केला आहे.

नोकरीवरून काढून टाकण्यात आलेल्या प्रत्येकाला तीन महिन्यांच्या वेतनाचे पॅकेज देण्यात आले आहे, जे कायदेशीर आवश्यकतेपेक्षा ५० टक्के जास्त आहे, असेही मस्क यांनी म्हटले आहे. भारतात कामावरून काढलेल्या कर्मचार्‍यांना देण्यात आलेल्या पॅकेजबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. भारतातील २००हून अधिक कर्मचार्‍यांपैकी बहुतेकांना कामावरून काढून टाकले असून संपूर्ण मार्केटिंग आणि कम्युनिकेशन विभाग बरखास्त करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

शुक्रवारी ट्विटरच्या शेकडो कर्मचार्‍यांना गुलाबी स्लिप देण्यात आल्या. अनेक कर्मचाऱ्यांना त्यांना काढून टाकण्यात आल्याचे ई-मेल मिळाले, तर काहींना आपल्या लॅपटॉपवर लॉग-इन करता येत नसल्याचे आढळले.

मस्क यांनी गेल्या महिन्याच्या अखेरीस तब्बल ४४ अब्ज डॉलरमध्ये विकत घेतलेल्या या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये बदल करण्यास सुरवात केली आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांसह कंपनीतील ७५०० हजार कर्मचाऱ्यांपैकी निम्म्या कर्मचाऱ्यांना सरळ कामावरून काढून टाकण्यात आले.

कंपनीने ३० जून २०२२ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत २७ कोटी डॉलरचा निव्वळ तोटा नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत कंपनीला सहा कोटी सहा लाख डॉलरचा नफा झाला होता. कंपनीच्या महसुलात लक्षणीय घट झाल्याबद्दल मस्क यांनी कर्मचाऱ्यांना दोष दिला आहे.