ट्रम्प यांच्या ट्विटरला मुसक्या; 'हिंसक टिवटिव'ची शक्यता वर्तवून अकाऊंट कायमचं बंद

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 January 2021

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी US कॅपिटल बिल्डींगच्या बाहेर जमून मोठा गोंधळ घातला होता.

नवी दिल्ली : शुक्रवारी ट्विटरने अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट कायमस्वरुपी बंद केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हिंसेला चिथावणी देणारी वक्तव्ये होण्याची जोखीम असल्याकारणाने ट्विटरने हा निर्णय घेतला आहे. @realDonaldTrump अकाऊंटवरील ट्वीट्सच्या संदर्भांना पाहिलं गेलं आणि त्यानंतरच अकाऊंट कायमस्वरूपी निलंबित करण्यात आलं, असं ट्विटरने स्पष्ट केलंय. बुधवारी वॉशिंग्टन डीसीमधील US Capitol येथे घडलेल्या  हिंसक अशा अभुतपूर्व प्रकारानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

ट्विटरने हा निर्णय जाहीर करताना म्हटलंय की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवरील ट्विट्सचा आढावा घेतल्यानंतर आम्ही संभाव्य हिंसेची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेत आहोत. त्यांचे ट्विट्स ज्याप्रकार अर्थबोध करतात त्यावरुन हिंसेला चिथावणी मिळत असल्याचे ट्विटरने म्हटलंय. या आठवड्यात  घडलेल्या भयानक घटनांकडे पाहता आम्ही बुधवारीच हे स्पष्ट केलं होतं की, ट्विटरच्या नियमांचे जर आणखी उल्लंघन केलं गेलं तर ही कठोर कारवाई केली जाईल. ट्विटरने पुढे म्हटलंय की ते त्याच्या धोरणांबद्दल आणि त्यांच्या अंमलबजावणीबद्दल नेहमी पारदर्शक राहतील.

डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन नोव्हेंबरला निवडणुकीनंतर सातत्याने दिशाभूल करणारे तसेच चिथावणीखोर ट्विट्स केले होते. अलिकडे शुक्रवारी केलेल्या ट्विटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की, ज्यांनी त्यांना मतदान केले आहे. त्यांच्यापैकी कोट्यावधी लोकांचा आवाज भविष्यात मोठा होईल आणि त्यांचा अनादर किंवा अन्याय हा सहन केला जाणार नाही.
त्यांनी त्यांच्या ट्विट्सच्या माध्यमातून एकप्रकारे हिंसेला प्रोत्साहन दिल्याचा ठपका ठेवत ट्विटरने ही कारवाई केली आहे.

US Capitol मध्ये काय घडलं होतं?

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी US कॅपिटल बिल्डींगच्या बाहेर जमून मोठा गोंधळ घातला होता. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा अशी घटना घडली. US Capital मध्ये घूसू पाहणारे ट्रम्प समर्थक आणि पोलिस यांच्या धुमश्चक्रीत चार आंदोलकांचा मृत्यू झाला होता. आधी मृत झालेल्या आंदोलक महिलेसह इतर तीन जणांना वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आपला जीव गमवावा लागला. या साऱ्या गोंधळाला जबाबदार धरुन 52 जणांना अटक करण्यात आली. या निदर्शकांनी सुरक्षा नियमांचा भंग करून आवारात प्रवेश केल्यावर संसदेतील खासदारांना अमेरिकेच्या कॅपिटलमधून थोडक्यात हलवले गेले. ट्रम्प यांनी गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या समर्थकांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला होता की, व्यापक पातळीवर झालेल्या घोटाळ्यामुळेच त्यांचा पराभव झाला. ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटलमध्ये हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांना पदावरून काढून टाकण्याच्या शक्यतेवर चर्चा झाली आहे. दरम्यान, या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर वॉशिंग्टन डीसीच्या महापौरांनी 15 दिवसांची आणीबाणी जाहीर केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter permanently suspends outgoing US President Donald Trumps account risk of further incitement of violence