ट्विटर बायडेन यांच्याकडे देणार अध्यक्षीय अकाऊंटचे अधिकार

वृत्तसंस्था
Saturday, 21 November 2020

ट्वीटरवरील खाते हस्तांतरीत करताना ट्रम्प प्रशासनाने बायडेन यांच्या टीमला कोणतीही माहिती शेअर करायची आवश्‍यकता नसून या खात्यावरील सर्व माहिती साठविली गेली असल्याचे ट्वीटरने म्हटले आहे.

लॉस एंजेलिस- विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार अखेरपर्यंत मानली नाही तरी, नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी २० जानेवारीला शपथ ग्रहण करताच त्यांच्याकडे ट्वीटरवरील अमेरिकेच्या अध्यक्षांसाठी असलेल्या @POTUS या खात्याचे अधिकार सुपूर्द करणार असल्याचे ट्वीटर कंपनीने जाहीर केले आहे. हे अध्यक्षांचे अधिकृत ट्वीटर खाते असून डोनाल्ड ट्रम्प हे शक्यतो त्यांच्या वैयक्तिक खात्यावरून ट्वीट करतात.

ट्वीटरवरील खाते हस्तांतरीत करताना ट्रम्प प्रशासनाने बायडेन यांच्या टीमला कोणतीही माहिती शेअर करायची आवश्‍यकता नसून या खात्यावरील सर्व माहिती साठविली गेली असल्याचे ट्वीटरने म्हटले आहे. फक्त बायडेन यांनी पदाची सूत्रे स्वीकारताच, ट्वीटर खात्यावरील ट्वीटची पाटी कोरी केली जाणार आहे.

दर्जेदार पुस्तकांच्या यादीत 3 भारतीयांची पुस्तके; ‘न्यूयॉर्क टाइम्स’कडून यादी...

सत्तांतरासाठी ट्रम्प प्रशासनाकडून सहकार्य

सत्तेचे हस्तांतर करण्यासाठी आवश्‍यक असलेली सर्व प्रशासकीय प्रक्रिया ट्रम्प प्रशासनाने पूर्ण केली असल्याचा दावा ‘व्हाइट हाउस’तर्फे करण्यात आला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अद्यापही पराभव मान्य केला नसल्याने नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या सहकाऱ्यांना प्रशासकीय सूत्रे स्वीकारण्यात अनेक अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे, मात्र निवडणूक निकालाची अधिकृत प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, असे निदर्शनास आणून दिले. ३ नोव्हेंबरला झालेल्या निवडणूकीत अमेरिकी जनतेने प्रतिनिधींची निवड केली असून हे प्रतिनिधी पुढील महिन्यात मतदान करून अध्यक्षांची निवड करणार आहे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter will give joe Biden the power of presidential account