
कोरोना रोखण्यासाठी दोन भिन्न लशी प्रभावी; WHOच्या शास्त्रज्ञांचा दावा
स्टॉकहोम : कोरोना विषाणूच्या नव्या-नव्या अवतारांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे. अशा वेळी दोन भिन्न लशी घेण्याची शिफारस जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) शास्त्रज्ञांनी केली. भिन्न लशींमुळे रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळ टिकेल आणि विषाणूंच्या विविध प्रकारांपासून संरक्षण मिळू शकेल, असा दावा त्यांनी केला आहे.
‘डब्ल्यूएचओ’च्या शास्त्रज्ञांच्या या शिफारशीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लशींचे डोस घेतल्यानंतर कोरोना विषाणूच्या प्रकारांविरोधात त्या प्रभावी ठरत आहेत. विषमशास्त्राची संकल्पना येथे लागू होत आहे. ज्या देशांत नागरिकांना लशीचा पहिला डोस दिला आहे आणि दुसऱ्या डोससाठी लशींची प्रतीक्षा करावी लागत आहे, अशा देशांना या ताज्या संशोधनामुळे संधी मिळणार आहे. पण याचवेळी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या (मिक्स अँड मॅच) लशी घेतल्यानंतर जास्त वेदना होणे, ताप येणे व अन्य किरकोळ परिणामांचे प्रमाण समान लशींपेक्षा जास्त असते, असे ब्रिटन, स्पेन आणि जर्मनीत दिसून आले आहे, अशा इशाराही स्वामीनाथन यांनी दिल्याचे ‘ब्लूमबर्ग’च्या अहवालात म्हटले आहे. कोरोनाच्या विविध प्रकारांचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या कंपन्यांच्या लशी घेता येतील, अशी सूचना याआधी अनेक शास्त्रज्ञांनी केली होती.
विषमशास्त्राच्या संकल्पनेचा वापर केलेले हे लशींचे एकत्रीकरण प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरणार असून प्रतिपिंड आणि विषाणूग्रस्त पेशी नष्ट करणाऱ्या पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढण्यास मदत होणार आहे, असे स्वामीनाथन यांनी सांगितले. लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी काही देशांनी संयुक्त लशींच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. उदा. मलेशियात ॲस्ट्राझेनेका आणि फायझर -बायोएनटेक या दोन कंपनीच्या लशींचे डोस देण्यात विचार सुरू आहे. यावर्षअखेरिस तेथील नागरिकांमध्ये समूह रोगप्रतिकारकता निर्माण करण्याचा उद्देश यामागे असल्याचे तेथील विज्ञान, तंत्रज्ञान मंत्री खैरी जमालुद्दिन यांनी सांगितले.
काही देश आणि औषध निर्माण कंपन्यांचे अधिकाऱ्यांनी कोरोना विषाणूच्या प्रकारांवर बूस्टर डोस देण्याची तयारी केली आहे. पण याची गरज भासेल की नाही हे आत्ता सांगणे घाईचे ठरेल, असे मत आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. बूस्टर डोसची आवश्यकता आहे का नाही याची शिफारस केल्याची माहिती आम्हाला नाही. अनेक देशांत कोरोनाप्रतिबंधक लसीकरण अद्याप सुरू झाले नसल्याने असे करणे अपरिपक्कता ठरेल, असे स्वामीनाथन यांनी स्पष्ट केले.
ब्रिटनमध्ये बूस्टर डोस?
हिवाळ्यातील कोरोनाची आणखी एक लाट रोखण्यासाठी ब्रिटनमध्ये बूस्टर डोस देणार असल्याचे तेथील आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी पूर्वी सांगितले होते. जगातील पहिला बूस्टर डोसचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडमध्ये स्वयंसेवकांवर सात भिन्न लशींच्या चाचण्या सुरू असल्याचे ते म्हणाले होते.