पतीच्या प्रेमाचा आता कंटाळा आलाय हो...

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

आमचं लग्न एक वर्षापूर्वी झाले आहे. पण, माझा नवरा नुसतंच प्रेम करतोय. प्रेम सोडून काही करतच नाही.

दुबईः आमचं लग्न एक वर्षापूर्वी झाले आहे. पण, माझा नवरा नुसतंच प्रेम करतोय. प्रेम सोडून काही करतच नाही. नवऱयाच्या प्रेमाचा आता कंटाळा आलाय हो. मला आता घटस्फोट हवा आहे, अशी याचिका संयुक्त अरब अमिरातच्या एका महिलेने फुजैरा येथील शरिया न्यायालयात दाखल केली आहे.

पती-पत्नीची विविध कारणांवरून भांडणे होत असतात. विविध कारणावरून दोघेही घटस्फोटाची मागणी करताना दिसतात. मात्र, येथील एक घटस्फोटाचे कारण वेगळेच आहे. घटस्फोटाचे वृत्त येथील 'खलिज टाइम्स'ने दिले आहे.

महिलेने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, 'पती कधी माझ्यावर ओरडतच नाही. किंवा, मला चीड यावी असेही वागत नाही. घरातील साफसफाई असो किंवा जेवण बनवण्यातही तो मदत करतो. अनेकदा ही सर्व कामे तोच करतो. आमच्या विवाहाला एक वर्ष झाले. मात्र, आमच्यात एकदाही भांडण झालेले नाही. पतीच्या या प्रेमाचा आता मला कंटाळा आलाय. गेल्या कित्येक दिवसांपासून मी भांडण करण्याचा प्रयत्न करतेय पण माझा रोमॅंटिक पती भांडणाची कोणती संधीच देत नाही. भांडणासाठी मुद्दाम मी चुकीचा मार्गही वापरला पण तो दरवेळेस मला माफ करतो. एखाद्या मुद्यावर तरी त्याच्याशी मतभेद व्हावेत आणि वादविवाद व्हावा किंवा किमान चर्चा तरी व्हावी, जेणेकरुन माझं लग्न झाले आहे, असे मला वाटेल अशी माझी इच्छा आहे.'

न्यायाधिशांनी विचारले की, घटस्फोटासाठी तू खरंच गंभीर आहेस का? हो, मला खरंच घटस्फोट हवा आहे. अती प्रेम हे आरोग्यासाठी चांगले नसते. पती-पत्नीमध्ये प्रेम सोडून इतर गोष्टीही महत्त्वाच्या असतात. मात्र, पतीने न्यायालयाकडे याचिका फेटाळून लावण्याची मागणी करताना म्हटले आहे की, 'मी केवळ एक आदर्श आणि उत्तम पती बनण्याचा प्रयत्न करत होतो. केवळ एकाच वर्षात एखाद्याच्या लग्नाबाबत निर्णय देणे योग्य नाही.' दरम्यान, न्यायालयाने दोघांनाही विचार करून निर्णय घेण्याचा सल्ला दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UAE woman seeks divorce says husbands constant concern and kindness driving her crazy