नीरव मोदीला दणका; ब्रिटनमध्ये निघाले अटक वॉरंट

वृत्तसंस्था
सोमवार, 18 मार्च 2019

भारतातील बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या अटकेच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. ब्रिटनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने मोदीविरोधात अटक वॉरंट काढले आहे. 

लंडन : भारतातील बँकांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या अटकेच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. ब्रिटनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टाने मोदीविरोधात अटक वॉरंट काढले आहे. 

मोदीने भारतात पंजाब नॅशनल बँकेचे एकूण 13,700 कोटी रुपयांचे कर्ज बुडविले आहे. कारवाईच्या भीतीने मोदीने लंडनला पळ काढला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्याचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासंदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सातत्याने ब्रिटनशी संपर्क साधला आहे. 

मोदीच्या विरोधात न्यायालयाने काढलेले अटक वॉरंट त्याच्या लंडनमधील घरी दिले जाणार आहे. हे अटक वॉरंट म्हणजे मोदीला भारताकडे हस्तांतर करण्याच्या अधिकृत प्रक्रियेतील पहिला टप्पा आहे. लंडनमध्ये आरामात वावरत असलेल्या मोदीची मुलाखत घेण्याचा प्रयत्न ब्रिटनमधील एका दैनिकाने केला. यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारताच्या विनंतीची दखल घेतली. 

सक्तवसुली संचनालय (ईडी) आणि सीबीआयचे एक पथक लवकरच लंडनमध्ये दाखल होणार आहे. हे पथक न्यायालयासमोर मोदीविरोधातील पुरावे सादर करेल. गेल्या वर्षी मोदी आणि त्याचा नातेवाईक मेहुल चोक्‍सीविरोधात 'ईडी'ने कारवाई सुरू केली होती. त्यानंतर दोघांनीही भारतातून पळ काढला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UK court issues arrest warrant against Nirav Modi in PNB fraud