
युक्रेनकडून रशियाच्या नाकेबंदीचे प्रयत्न
किव्ह : रशियाच्या हल्ल्यांमुळे अनेक शहरे उद्ध्वस्त झाली असतानाही युरोप आणि अमेरिकेकडून मोठे पाठबळ मिळत असलेल्या युक्रेनकडून आता रशियाचीच नाकेबंदी करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. रशियातून पश्चिम युरोपला नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारे युक्रेनमधील पाइपलाइन केंद्रच बंद करण्याचा निर्णय युक्रेन सरकारने घेतला आहे. याशिवाय, प्रत्यक्ष युद्धभूमीवरही युक्रेनला काही ठिकाणी यश मिळत असून खारकिव्ह शहराजवळील चार गावांमधून रशियाच्या सैनिकांना पिटाळून लावण्यात आले आहे.
रशियातून युरोपला मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जातो. पश्चिम युरोपला नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारी पाइपलाइन युक्रेनमधील नोव्होप्स्कोव्ह या शहरातून जाते. या शहरावर रशियासमर्थक बंडखोरांचे नियंत्रण आहे. पश्चिम युरोपला होणाऱ्या एकूण वायू पुरवठ्यापैकी एक तृतियांश वायू याच केंद्रामार्गे जातो. हे केंद्र आजपासून बंद करण्याचा निर्णय युक्रेन सरकारने घेतला आहे. रशियाचे सैनिक कामकाजात हस्तक्षेप करत असल्याने आणि नैसर्गिक वायू चोरत असल्यानेही वायू पुरवठा थांबवत असल्याचे युक्रेन सरकारने म्हटले आहे. युक्रेनच्या या निर्णयामुळे रशियाला त्यांच्या नैसर्गिक वायूचा पुरवठा युक्रेन सरकारचे नियंत्रण असलेल्या भागातून वळवावा लागणार आहे. यामुळे रशियाला अधिक खर्च येणार आहे.
युक्रेनकडून प्रतिहल्ले
युक्रेनमधील खारकिव्हजवळील चार गावांमधून रशियाच्या सैनिकांना मागे ढकलण्यात यश आल्याचा दावा देशाचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. रशियाला मागे ढकलणे एवढेच उद्दीष्ट नसून युक्रेनमधून रशियाला बाहेर काढणे हेच उद्दीष्ट आहे, असे युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दीमित्रो कुलेबा यांनी सांगितले. काळ्या समुद्रातील स्नेक बेटांवरील रशियाच्या सैनिकांवरही युक्रेनचे हल्ले सुरु झाल्याने रशियाचे आक्रमणाचे प्रयत्न विस्कळीत झाले आहेत.
Web Title: Ukraine To Blockade Russia Natural Gas Supply Pipeline Closed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..