तुर्कस्तानची ओळख आता ‘तुर्किये’

नामकरणाला ‘यूएन’ची मंजुरी; आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सफल
un registers turkey as trkiye António Guterres
un registers turkey as trkiye António Guterressakal

अंकारा : तुर्कस्तानचे अधिकृत नाव आता ‘तुर्किये’ असे झाले आहे. संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी बुधवारी (ता. १) या बदलाला मंजुरी दिली. तुर्कस्तानचे परराष्ट्र मंत्री मेवलुत कावुसोग्लू यांनी त्यांचा देश यापुढे तुर्कस्तान नाही तर तुर्किये या नावाने ओळखला जाईल, असे लेखी कळविले असून ‘यूएन’ने त्याला मंजुरी दिली असल्याचे गुटेरेस यांनी सांगितले.

नामकरणाचा हेतू

जगात ‘तुर्किये’ ब्रँड तयार व्हावा, अशी तुर्कस्तानच्या सरकारची इच्छा आहे. याचे कारण म्हणजे ‘टर्की’ किंवा ‘तुर्की’ या शब्दांचा अर्थ तेथील भाषेनुसार नकारात्मक असल्याचे मानले जात आहे. यामुळे १९२३ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच तेथील नागरिक ‘तुर्किये’ (तुर्कस्तानी भाषेतील उच्चार तूर-की-याय) हेच नाव वापरत आहेत. या नावाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळण्यासाठी अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान हे अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत होते. ‘यूएन’ने त्यावर मोहोर उमटविल्याने त्यांचे प्रयत्न सफल ठरले आहेत.

सरकारी कागदपत्रांमध्ये ‘तुर्किये’

तुर्की संस्कृती लक्षात घेऊन तुर्कस्तानऐवजी ‘तुर्किये’ असा शब्दप्रयोग वापरण्याचा आदेश एर्दोगान यांनी गेल्या वर्षी दिला होता. त्यानुसार परदेशात निर्यात होणाऱ्या सर्व उत्पादनांवर ‘मेड इन तुर्किये’ असे लिहिले जाऊ लागले होते. देशातील सर्व मंत्रालयांनीही अधिकृत कागदपत्रांवर देशाचे नाव ‘तुर्किये’ असे लिहिण्यास सुरुवात केली होती. तुर्कस्तानमधील पर्यटनविषयक चित्रफितींमध्येही ‘हॅलो तुर्किये’ म्हटले जात आहे.

‘तुर्कस्तान’चे वावडे

तुर्कस्तानी भाषेत ‘तुर्की’ या शब्दांचे अनेक अर्थ आहेत. हा शब्द इंग्रजीत ‘टर्की’ असा लिहिला जातो आणि या अर्थ ‘मूर्ख’ असा होतो. तसेच हा शब्द अपयश या अर्थानेही उच्चारला जातो. ‘टर्की’ हे एका पक्ष्याचेही नाव आहे. उत्तर अमेरिकेत नाताळातील पार्ट्यांमध्ये या पक्ष्यांचे मांस शिजवून खाण्याचा प्रघात आहे. म्हणून ‘तुर्की’ नाव बदलून ‘तुर्किये’ असे ठेवण्याचा उद्देश सरकारचा होता.

या देशांनीही बदलले आहे नाव...

आधी - आता

हॉलंड - नेदरलँड

ब्रह्मदेश - म्यानमार

फारस - इराण

सिलोन - श्रीलंका

स्वाझिलँड - इस्वातीनी

मॅसिडोनिया - उत्तर मॅसिडोनिया

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com