इराणवरील निर्बंधांच्या मुद्द्यावरुन अमेरिका एकाकी

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 17 September 2020

अनेक मित्र देशांचा विरोध असताना अमेरिका इराणवर सर्व आंतरराष्ट्रीय निर्बंध पुन्हा एकदा लागू करण्याच्या तयारीत आहे.

वॉशिंग्टन- अनेक मित्र देशांचा विरोध असताना अमेरिका इराणवर सर्व आंतरराष्ट्रीय निर्बंध पुन्हा एकदा लागू करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेच्या या कृतीमुळे संयुक्त राष्ट्रांच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल, असा इशारा काही देशांनी दिला आहे.

इराणने अण्वस्त्रबंदी करण्याच्या बदल्यात त्यांच्यावरील आर्थिक निर्बंध हटविण्याचा करार अमेरिकेसह सहा जगातिक शक्तींनी २०१५ मध्ये केला होता. या करारानंतर इराणवरील निर्बंध जाऊन त्यांना व्यापार करणे शक्य झाले होते. मात्र, इराण कराराचे पालन करत नसल्याचे सांगत अमेरिकेने या करारातून मागेच अंग काढून घेतले आहे. सध्या अमेरिका आणि इराणमधील तणाव शिगेला पोहोचला असल्याने अमेरिकेने २०१५ पूर्वी संयुक्त राष्ट्रांची इराणवर असलेली सर्व बंधने पुन्हा एकदा लागू करण्याची तयारी अमेरिका करत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा शनिवारी होण्याची शक्यता आहे. या करारामधील इतर देशांनी मात्र अमेरिकेच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याबाबतीत अमेरिका एकाकी पडली आहे.

मोठं पाऊल उचलावं लागलं तर मागे हटणार नाही; राजनाथ सिंहांचा चीनला इशारा

पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्रांना ७५ वर्षे पूर्ण होत असतानाच अमेरिकेबरोबर या संघटनेचा वाद होण्याची शक्यता आहे. आपल्याकडे दुर्लक्ष होणे, हे अमेरिका कितपत सहन करेल किंवा त्यांच्यावर याच कितपत फरक पडेल, यावर बऱ्याच घटना अवलंबून आहे. अमेरिकेने इराणवर आधीच अनेक निर्बंध घातले आहेत. आता, संयुक्त राष्ट्रांच्या इराणवरील पूर्वीच्या निर्बंधांची अंमलबजावणी जो देश करणार नाही, त्या देशावरही अमेरिका निर्बंध लादू शकते. यामुळे आधीच अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडलेली अमेरिका आंतरराष्ट्रीय समुदायापासून आणखी दूर जाऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘यूएन’मध्ये होणाऱ्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The US is alone on the issue of sanctions on Iran