डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलेला दिली माफी; मतांसाठी नवी चाल

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 19 August 2020

 अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता वेग मिळाला आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता वेग मिळाला आहे. फेरनिवडीसाठी रिंगणात उतरलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळपास दीडशे वर्षांपूर्वी मतदानाद्वारे बंड केलेल्या तसेच तुरुंगवास सोसलेल्या महिला समाजसुधारक सुझन बी. अँथनी यांना माफी जिली आहे. 

डेमोक्रॅटीक अधिवेशनात ज्यो बायडेन यांच्या उमेदवारीवरील शिक्कामोर्तबाची औपचारिकता पार पडण्याचे टायमिंग ट्रम्प यांनी साधले. बायडेन यांच्या जोडीला उपाध्यक्षपदासाठी आशियाई-आफ्रिकी वंशाच्या महिला उमेदवार कमला हॅरीस यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे महिला मतदारांची मते आपल्या बाजूने वळविण्याचाही ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. 

चीनची कोविड-19 लस डिसेंबरपर्यंत येणार बाजारात; भारताला मिळणार का?

सुझन यांच्या लढ्यामुळे महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्याच्या ऐतिहासिक घटनेचे यंदा शताब्दी वर्ष आहे. एकूण संदर्भ बघता ट्रम्प यांनी निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतल्याचे राजकीय निरीक्षकांचे पक्के मत आहे.

उत्सुकता ताणण्याची खेळी 

या निर्णयाविषयी उत्सुकता ताणली जावी म्हणून ट्रम्प यांनी आदल्यादिवशी सोमवारीच चाल केली होती. एअर फोर्स वन विमानात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मंगळवारी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीला माफी देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. ही व्यक्ती म्हणजे जागल्या एडवर्ड स्नोडेन किंवा माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लीन यांच्यापैकी कुणीही नसल्याची पुष्टी त्यांनी जोडली होती. राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या मार्फत सरकार लाखो लोकांची खासगी माहिती संकलित करीत असल्याचा गौप्यस्फोट स्नोडेनने केला होता. फ्लिन यांनी रशियाचे अमेरिकेतील तत्कालीन राजदूत सर्जी किसल्याक यांच्याबरोबरील संभाषणाबाबत एफबीआयला खोटी माहिती दिल्याचे कबूल केले होते.

प्रणव मुखर्जींची प्रकृती खालावली; रुग्णालयाने दिली माहिती

दरम्यान, अमेरिकेत 3 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणुका होणार आहेत.  रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अध्यक्षपदासाठी समोरासमोर आहेत. ट्रम्प यांना पुन्हा एकदा राष्ट्रपतीपदावर विराजमान होण्याची संधी आहे. मात्र, यावेळी त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. कोरोना महामारीची परिस्थिती हातळण्यात ते अपयशी होत असल्याचं दिसत आहे. शिवाय अमेरिकी अर्थव्यवस्थेला घरघर लागली आहे. यामुळे ट्रम्प यांच्याविरोधात वातावरण तयार होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या अनेक सर्वेक्षणात ट्रम्प यांची पिछाडी होत असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे जो बायडेन यांना लोकांची पसंती मिळत आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक चुरशीची होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election Donald Trump apologizes women for votes