US Election:"जो बायडेन राष्ट्रपती झाले तर अमेरिका जगभरात थट्टेचा विषय होईल"

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 14 August 2020

अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण तापत आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी जो बायडेन यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका जवळ आल्याने राजकीय वातावरण तापत आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी जो बायडेन यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.  जो बायडेन राष्ट्रपती झाले तर अमेरिका दिवाळखोरीत जाईल. तसेच अमेरिका जगामध्ये थट्टेचा विषय होईल, अशी टीका ट्रम्प यांनी केली आहे. बायडेन यांच्या प्रस्तावित नीती देशासाठी योग्य ठरणार नाहीत, असंही ट्रम्प म्हणाले आहेत. 

5 काय 500 राफेल आणले तरी फरक पडत नाही; पाकिस्तानची पोकळ धमकी

अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुकासंबंधी होणाऱ्या अनेक सर्वेक्षणांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची पिछाडी होताना दिसत आहे. अशात ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जो बायडेन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. बायडेन सत्तेवर आले तर अमेरिकेचे फार मोठे नुकसान होईल, असं ते म्हणाले आहेत. ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. 

बायडेन कोरोना महामारीवरुन राजकारण करत आहेत. त्यांना अमेरिकी नागरिकांप्रति सन्मान नाही. बायडेन कोरोना महामारीच्या संबंधात चूकीचे आराखडे सांगत आहेत. ते वैज्ञानिक पुराव्यांना दुर्लक्षित करत आहेत. तथ्य बाजूला ठेवून बायडेन केवळ राजनीती करत आहेत, असंही ट्रम्प म्हणाले. बायडेन राष्ट्रपती बनले तर सर्व जग अमेरिकेवर हसेल. शिवाय सर्व देश अमेरिकेचा फायदा उठवेल. आपला देश दिवाळखोरीत निघेल, असं ते म्हणाले.

उप-राष्ट्रपती पदाची उमेदवारी महिलेला मिळाल्याने पुरुषांचा अपमान- डोनाल्ड ट्रम्प 

जो बायडेन यांनी चीन आणि युरोपातील नागरिकांच्या अमेरिकेत येण्याच्या निर्बंधावर टीका केली होती. मी त्यांचे ऐकले असते तर आणखी लाखो लोकांचा जीव गेला असता. वेळेवर आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध घातल्याने कोरोनाबाधितांचे संक्रमण कमी झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.  बायडेन अमेरिकेच्या सीमा खुल्या ठेवून महामारी आतमध्ये पसरवू पाहात आहेत. अवैध प्रवाशांना ते देशात मोकळं रान देऊ पाहात असल्याचंही ट्रम्प म्हणाले.

दरम्यान, 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्रपती पदाच्या निवडणुका होत आहेत. यावेळी डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन मैदानात आहे. ट्रम्प यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदावर विराजमान होण्याची संधी असली तरी यावेळी त्यांचा मार्ग खडतर असणार आहे. कोरोना महामारी आणि ढासळती अर्थव्यवस्था यामुळे ट्रम्प यांच्या विरोधात वातावरण तयार होत आहे. दुसरेकडे जो बायडेन यांना पाठिंबा वाढताना दिसत आहे.

(edited by-kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election donald trump criticize joe biden america