esakal | US election: 'गाढव' की 'हत्ती' कोण मारणार बाजी? जाणून घ्या 10 महत्त्वाच्या गोष्टी
sakal

बोलून बातमी शोधा

donald trump

अमेरिकेत दर चार वर्षांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील सोमवारनंतरच्या मंगळवारी अध्यक्षपदासाठी निवडणूक होते.

US election: 'गाढव' की 'हत्ती' कोण मारणार बाजी? जाणून घ्या 10 महत्त्वाच्या गोष्टी

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- अमेरिकेत आज राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदान होत आहे. विविध सर्वेक्षणांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बायडेन प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा पुढे असल्याचे दिसत आहे. पण, याचा अंतिम निकाल मतदान संपल्यानंतरच येईल. डेमोक्रॅटिक पक्षाचे निवडणूक चिन्ह गाढव आहे, तर रिपब्लिकन पक्षाचे निवडणूक चिन्ह हत्ती आहे. अमेरिकी निवडणुकीसंबंधी 10 महत्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊया...

अमेरिकेत दोन पक्षांमध्ये होत आहे टक्कर? 

अमेरिकेत दर चार वर्षांनी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील सोमवारनंतरच्या मंगळवारी अध्यक्षपदासाठी निवडणूक होते. अमेरिकेत दोन पक्ष पद्धत आहे आणि अध्यक्ष या दोन पक्षांपैकीच होतो. रिपब्लिकन पुराणमतवादी पक्ष आहे. या पक्षाला ग्रँड ओल्ड पार्टीसुद्धा म्हटले जाते. दुसरीकडे डेमोक्रॅटिक उदारमतवादी पक्ष आहे. 

अमेरिकेत कोण लढू शकतो निवडणूक?

अमेरिकेच्या संविधानानुसार, अमेरिकेत जन्म घेणारा कोणताही नागरिक ज्याचे वय 35 आहे आणि जो 14 वर्षांपासून अमेरिकेत राहत आहे तो निवडणूक लढवू शकतो. यावेळी 1000 पेक्षा अधिक लोकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

राष्ट्राध्यक्ष कोण हे ठरवण्यापुरतीच ही निवडणूक असते का?

ही निवडणूक फक्त राष्ट्राध्यक्ष निवडण्यापुरतीच मर्यादित नसते. याच निवडणुकीद्वारे मतदार काँग्रेसच्या नवीन सदस्यांची निवड करतात. अमेरिकेत काँग्रेस आणि सिनेट अशी दोन सभागृह आहेत. कायदे लिहिणाऱ्या आणि मंजूर करणाऱ्या गटाला 'काँग्रेस' म्हणतात, तर सिनेटमध्ये अमेरिकेतील 50 राज्यांचे प्रत्येकी दोन असे 100 प्रतिनिधी असतात. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज किंवा 'काँग्रेस'च्या सदस्यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असतो, तर सिनेटच्या सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो.

सर्वाधिक मते मिळवणारी व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होईलच असे नाही

गेल्या काही काळात अमेरिकेत अशी एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे की, सर्वाधिक मते मिळवणारी व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होईलच असे नाही. अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 2016च्या निवडणुकीत जिंकले खरे... पण सर्वाधिक मते हिलरी क्लिंटन यांना मिळाली होती... ट्रम्प यांच्यापेक्षा तब्बल तीस लाख मते त्यांना जास्त मिळाली होती. हे विचित्र गणित तयार झाले आहे इलेक्टोरल कॉलेजमुळे.

'विनर टेक्स ऑल'ची वादग्रस्त पद्धत

येथे एक उदाहरण पाहू... कॅलिफोर्निया राज्याच्या वाट्याला सर्वाधिक म्हणजे ५५ जागा येतात. आता यातील समजा 30 जागा रिपब्लिकन पक्षाला आणि 25 जागा डेमोक्रॅटिक पक्षाला मिळाले. म्हणजे रिपब्लिकनला बहुमत मिळाले तर सर्व जागा म्हणजे 55 च्या 55 जागा रिपब्लिकन पक्षाला दिले जातात. यालाच विनर टेक्स ऑल म्हटलं जातं. याच मुळे 2016 च्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांना जास्त मते मिळूनही त्यांना 270 चे बहुमत गाठता आले नव्हते

निकाल कधी हाती येणार?

निवडणुकीचा निकाल लगेच हाती येण्याची शक्यता नाही. कारण कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक लोकांनी मेल इन बॅलेट किंवा पोस्टाने मतदान केले आहे. यांची मोजणी करण्यासाठी अनेक दिवस लागू शकतात. पण, दोन दिवसात मतदारांचा कौल स्पष्ट होऊ लागेल. 

अध्यक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी किती जागा हव्यात?

अमेरिकेत राष्ट्रपतीपदी विराजमान होण्यासाठी ट्रम्प किंवा बायडेन यांना इलेक्ट्रोरल कॉलेजचे 50 टक्के मत मिळवावे लागेल. अमेरिकेत 538 इलेक्ट्रोरल कॉलेज आहेत. याचा अर्थ कोणत्याही उमेदवाराला जिंकण्यासाठी 270 पेक्षा अधिक मतांची आवश्यकता असेल. 

अमेरिकी निवडणुकीत पॉप्युलर वोट काय असतं?

अमेरिकेच्या निवडणुकीत मतदार थेट आपल्या अध्यक्षपदाच्या उमेदवारा मत देत नसतात, तर ते इलेक्टर्स निवडून देत असतात. नागरिक अध्यक्ष नाही तर राज्यातील प्रतिनिधीची निवड करत असतात. त्यानंतर हे इलेक्टर राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारासाठी मत देतात. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, मतदारांनी ज्या इलेक्टरला निवडलं आहे, त्याने मतदारांच्या आवडीच्या अध्यक्षीय उमेदवारालाच मत द्यावे याचे बंधन नाही. पॉप्युलर वोटच्या माध्यमातून 50 राज्यातील मतदार 538 इलेक्टर्सची निवड करत असतात. याला इलेक्टोरल कॉलेज म्हणतात. 

अमेरिकेत किती आहेत भारतीय-अमेरिकी मतदार?

अमेरिकेत जवळपास 20 लाख भारतीय-अमेरिकी मतदार आहे. याची संख्या अमेरिकेच्या मतदारांपैकी 0.82 टक्के आहे. अमेरिकेत भारतीय समुदायाला प्रभावशाली मानलं जातं. डेमोक्रॅटिक पक्षाने उपराष्ट्रपतीपदासाठी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना संधी देऊन भारतीय समुदायाला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला आहे.

अमेरिकेत कोणते राज्य आहेत स्विंग स्टेट?

अमेरिकेत अशी अनेक राज्य आहेत जेथे ट्रम्प आणि बायडेन यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे. काही राज्ये एखाद्या पक्षाचे गढ असतात. पण काही राज्यातील मतदार कोणत्याही पक्षाकडे झुकू शकतात, म्हणून अशा राज्यांना 'स्विंग स्टेट' म्हटलं जातं. अध्यक्षपदाचे उमेदवार अशाच राज्यांमध्ये जास्त लक्ष देत असतात.   

अमेरिकी अध्यक्षांचा शपथविधी सोहळा कधी होईल?

अमेरिकेच्या संविधानात शपथविधी सोहळ्याची तारीख निश्चित आहे. विजयी उमेदवार 20 जानेवारी रोजी व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करतो. या दिवशी व्हाईट हाऊसमध्ये दिमाखदार सोहळा होत असतो. विशेष म्हणजे अमेरिकीच्या इतिहासात आतापर्यंत ही मालिका तुटलेली नाही. 20 जानेवारीपासून नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष पदभार सांभाळतात. 

(edited by- kartik pujari)

loading image