निवडणूक हरल्यास ट्रम्प यांचा सहजासहजी पायउतार होण्यास नकार!

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 24 September 2020

अमेरिकेत तीन नोव्हेंबरला अध्यक्षीय निवडणूक होत आहे.

वॉशिंग्टन-  अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाल्यास तो सहज मान्य करून शांततेत सत्तांतर करण्यास अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अप्रत्यक्षपणे नकार दिला. टपालाद्वारे होणाऱ्या मतदानावर शंका असल्याने निवडणुकीचा निकाल कदाचित सर्वोच्च न्यायालयातच लागेल, असे ट्रम्प यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

अमेरिकेत तीन नोव्हेंबरला अध्यक्षीय निवडणूक होत आहे. ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांचे आव्हान असून कलचाचणीमध्ये बायडेन यांच्याच विजयाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोरोना संसर्गामुळे अमेरिकेतील मतदारांचा टपालाद्वारे मतदान करण्याकडे कल वाढत आहे. ट्रम्प यांनी आधीही अनेकदा टपालाद्वारे होणाऱ्या मतदानात गैरप्रकार होण्याची शंका व्यक्त केली आहे. आज पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, टपालाद्वारे होणारे मतदान ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. त्याचा अडथळा दूर केला तरच सर्व योग्य होईल. मतपत्रिकांवर नियंत्रण ठेवणे अशक्य आहे.

"स्वत:ला भारतीय मानत नाहीत काश्मिरी, त्यांना चीनचं शासन हवय"

अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुका जवळ आल्याने डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचाराचा धडका लावला आहे. सोबत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. टपाल पद्धतीने होणाऱ्या मतदानात मोठा घोटाळा होणार असल्याचं ट्रम्प म्हणाले आहेत. तसेच डेमोक्रॅटिक पक्षाला टपाल पद्धतीने मतदान हवे आहे. त्यामुळे ते घोटाळा करु शकतील,  असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, टपाल पद्धतीने निवडणूक निकालात काही फेरफार केला जाऊ शकतो, याबाबत पुरावा नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा निवडून  येण्याची संधी आहे. मात्र, यावेळी त्यांच्यासमोर अनेक अडचणी आहेत. कोरोना महामारीमुळे अमेरिका हैराण आहे. आतापर्यंत 2 लाखांपेक्षा अधिक लोकांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीला हाताळण्यात कमी पडल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर होत आहे. दुसरीकडे ब्लॅक लाईव्ह मॅटर आंदोलनाने अमेरिकत जोर पकडला आहे. कृष्णवर्णीय मते ट्रम्प यांच्या विरोधात गेली आहेत. आर्थिक पातळीवरही अमेरिकेची घसरण होत असल्याने ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बायडेन यांची सरशी होताना दिसत आहे. अनेक सर्वेक्षणात बायडेन यांचा विजय होईल असं सांगण्यात आलंय. पण, 2016 च्या निवडणुकीत हिलरी क्लिंटन यांचा विजय पक्का मानला जात असताना, ट्रम्प यांनी सगळ्यांनाच धक्का दिला होता. त्यामुळे अमेरिकी निवडणुकीचा निकाल काय लागेल याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election donald trump said about ballot paper voting