निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी ट्रम्प चीनवर ड्रोन हल्ला करतील?

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 29 September 2020

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्रपतीपदासाठी मैदानात आहेत

बिजिंग- अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्रपतीपदासाठी मैदानात आहेत. ट्रम्प यांचे पुन्हा राष्ट्रपतीपदावर विराजमान होणे अवघड मानलं जातं आहे. अशात चीनच्या सरकारी ग्लोबल टाईम्सच्या संपादकाकडून धक्कादायक दावा करण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प चीनवर ड्रोन हल्ला करतील, असं ते म्हणाले आहेत. 

मेंदू खाणाऱ्या अमिबाने 6 वर्षाच्या मुलाचा घेतला जीव; अमेरिकेत हाय अलर्ट

संपादक हू शिजिन यांनी यांसदर्भात ट्विट केलं आहे. मला वाटतं की डोनाल्ड ट्रम्प पुन्हा विजयी होण्यासाठी दक्षिण चिनी सागरातील चीनच्या बेटांवर हल्ला करतील. MQ-9 रीपर ड्रोनने मिसाईल हल्ला करण्याचे पाऊल ट्रम्प सरकार उचलू शकते. जर असे झाले तर चिनी सैन्य पीपल्स लिबरेशन आर्मी नक्कीच जोरदार पलटवार करील. ज्या लोकांनी युद्ध सुरु केले, त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असा धमकीवजा इशारा हू यांनी दिला आहे.

तैवान प्रकरणी चीन आणि अमेरिकेमध्ये तणाव वाढत आहे. अमेरिकेने आपले तैवानमधील सैन्य मागे घेतले नाही, तर चीन युद्ध सुरु करेल, अशी धमकी ग्लोबल टाईम्सने याआधी दिली होती. ग्लोबल टाईम्सच्या संपादकांनी अमेरिका आणि तैवानला अत्यंत गंभीर इशारा दिला होता. आम्ही काय करु शकतो याची तुम्हाला कल्पनाही नाही, असं ते म्हणाले आहेत. 

चीन आणि अमेरिकेत झालेला करार तुटणार!

तैवानमध्ये होणारा अमेरिकाचा हस्तक्षेप आणि तैवानमधील फुटीर लोकांबाबत चीनने चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेने तैवानमध्ये सैनिक पाठवल्यास चीनसोबतचा त्यांचा करार तुटणार आहे. अमेरिकेने तैवानमध्ये सैन्य पाठवले तर त्याचे गंभीर परिणाम होतील. पीएलए आपल्या सामर्थ्यांच्या जोरावर तैवानचे एकीकरण करेल, असा इशारा चीनकडून देण्यात आला आहे. 

World Heart Day 2020 - छातीत दुखणं एवढं एकच नाही हार्ट अटॅकचं लक्षण

दरम्यान, तैवानच्या आखातात सध्या तणावाची स्थिती आहे. दक्षिण चिनी सागरात निवडणुकीपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हल्ला करतील, अशी भिती चीनला सतावू लागली आहे. 1979 च्या तैवान रिलेशन अॅक्टनुसार अमेरिका तैवानला मदत करण्यासाठी बांधिल आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election us president donald trump will drone attack on china before election