ट्रम्प गंभीर आजारी राहिल्यास काय होईल? निवडणुका टळतील की राष्ट्रपती बदलेल?

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 5 October 2020

अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 30 दिवसांपेक्षाही कमी कालावधी राहिला आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी 30 दिवसांपेक्षाही कमी कालावधी राहिला आहे. पहिल्या प्रेसिडेंशियल डिबेटनंतर अमेरिका आणि सर्व जगाला धक्का देणारी बातमी आली. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. ट्रम्प यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निवडणुकीआधी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

अटल बोगद्यामुळं चीनचा जळफळाट; बोगदा उडवून देण्याची ग्लोबल टाइम्सची भाषा

निवडणुका होणार नाहीत किंवा पुढे ढकलल्या जातील का?

डोनाल्ड ट्रम्प आजारी पडल्याने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातील का? असे प्रश्न विचारले जात आहेत. निवडणुकीसाठी 30 दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे. ट्रम्प आजारी असल्याने त्याचा परिणाम निवडणूक प्रचारावर नक्कीच पडणार आहे. 15 ऑक्टोबर रोजी दुसरी प्रेसिडेंशियल डिबेट होणार आहे. यावेळी ते उपस्थित राहण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ते सामील होऊ शकतात. निवडणुकीच्या तारखेबाबत बोलायचं झालं तर ते पुढे ढकलल्या जाऊ शकत नाहीत. कारण, लाखो अमेरिकी नागरिकांनी आपले मतदान केले आहे, त्यामुळे निवडणूक सुरु झाली आहे. कोरोना संकटामुळे अनेकांनी मेल-इन (पोस्ट) पद्धतीने आपले मत दिले आहे.

पूर्वीपासूनच अमेरिकी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पार पडत आल्या आहेत. शिवाय संविधानातही याचा उल्लेख आहे. त्यामुळे केवळ व्हाईट हाऊस या निवडणुका पुढे ढकलू शकत नाही. निवडणुका पुढे ढकलण्यासाठी संसदेची मंजूरी आणि संविधानात दुरुस्तीची आवश्यकता लागणार आहे. जे इतक्या कमी कालावधीत होणे कठीण आहे. त्यामुळे ट्रम्प आजारी असले तरी निवडणूक प्रक्रिया सुरुच राहिल.

राफेलचा पहिल्यांदाच वायुसेना दिवस परेडमध्ये समावेश; जग्वार, सुखोईही दाखवणार दम

राष्ट्रपती बदलेल का?

जगातील अनेक लोकशाही देशांप्रमाणे अमेरिकेमध्येही 'ट्रान्सफर ऑफ पॉवर'चा पर्याय आहे. जर देशाचा राष्ट्रपती गंभीर आजारी असेल, सरकार चालवण्यास असमर्थ ठरल्यास किंवा राष्ट्रपतीने कॅबिनेटचा विश्वास गमावल्यास त्याला पदावरुन हटवून दुसऱ्या कोणाला जबाबदारी दिली जाऊ शकते. अमेरिकी संविधानाच्या 25 व्या दुरुस्ती अंतर्गत असे केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत सरकारची सर्व शक्ती उपराष्ट्रपतींच्या हाती जाते. जर ट्रम्प यांना वाटलं की, ते सरकार चालवण्यास असमर्थ आहेत तर ते याबाबत सीनेट लीडर, रिप्रेझेंटेटिव्ह लिडर यांना याबाबत सूचित करु शकतात. त्यामुळे अशावेळी उपराष्ट्रपती माईक पेंस यांच्या हातात सत्ता जाऊ शकते. 

याआधीही अमेरिकीत अशी परिस्थिती निर्माण झाली होती. 1985 मध्ये तत्कालिक अध्यक्ष रोनाल्ड रीगन यांची सर्जरी होणार होती, त्यावेळी त्यांनी उपराष्ट्रपती जॉर्ज बुश (सीनियर) यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. याशिवाय जॉन कॅनेडी यांच्या हत्येनंतर उपराष्ट्रपतींना भार देण्यात आला होता. मात्र, सध्या तरी सत्ता डोनाल्ड ट्रम्प यांच्याच हाती आहे. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election what happen if us president donald trump did not recoverd