डोनाल्ड ट्रम्प यांचा आजार वाढला तर कोणाकडे जाणार सत्ता?

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 3 October 2020

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, ट्रम्प यांना रुग्णालयात हलवल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. जर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रकृती गंभीर बनली तर अशा परिस्थितीत देशाची सत्ता उपराष्ट्रपती माइक पेन्स यांच्या हातात दिली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे.

उपराष्ट्रपती माइक पेन्स यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसाप, माइक पेन्स यांची प्रकृती ठीक आहे. सध्या ते व्हाइट हाऊसमध्ये नाहीत तर वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकन नौसेनेच्या वेधशाळेत असलेल्या घरामध्ये आहेत. तिथं माइक पेन्स पुर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली. शुक्रवारी ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर ट्रम्प यांना रेमडेसिविर दिले जात असून रुग्णालयात दाखल केलं आहे. 

कोरोना लस लवकरच मिळणार; ब्रिटनने दिली चांगली बातमी

दरम्यान, ट्रम्प यांनी रुग्णालयात दाखल होण्याआधी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये ट्रम्प यांनी म्हटलं की, मला अजुन काही त्रास नाही. तसंच मेलानिया यांची प्रकृतीसुद्धा ठीक आहे. दोघांची तब्येत सुधारत आहे. मात्र जर ते जास्त आजारी पडले तर उपराष्ट्रपती माइक पेन्स सत्ता हाती घेऊन राष्ट्राध्यक्षांची जबाबदारी पार पाडू शकतात.

अमेरिकेच्या संविधानातील 25 व्या सुधारणेनुसार माइक पेन्स यांच्याकडे सत्तेचं हस्तांतरण केलं जाऊ शकतं. ट्रम्प यांनी सत्ता हस्तांतरणाच्या कागदपत्रावर स्वाक्षरी केली नाही तरी माइक पेन्स जबाबदारी स्वीकारू शकतात. संविधानानुसार राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू झाल्यास, राजीनामा दिल्यास किंवा त्यांच्या कार्यकाळात जबाबदारी सांभाळण्यास असमर्थ ठरल्यास उपराष्ट्रपती देशाची सूत्रे हाती घेऊ शकतात. 

Hathras - अखेर स्मृती इराणींनी सोडलं मौन, राहुल गांधींवर केली टीका

प्रकृती बिघडल्यानं राष्ट्राध्यक्ष देशाचा व्यवहार सांभाळण्यास असमर्थ ठरत असतील तर उपराष्ट्रपतींकडे सत्तेचं हस्तांतरण केलं जाऊ शकतं. 25 व्या सुधारणेननुसार उपराष्ट्रपतींना कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून कार्यालयात कामकाज आणि जबाबदारी स्वीकारता येते. 

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची 1963 मध्ये हत्या झाली होती. त्यानंतर सविंधानात सुधारणा करण्यात आली होती. 1965 मध्ये काँग्रेसनं या सुधारणेला मंजुरी दिली होती. आता ट्रम्प यांची प्रकृती गंभीर झाल्यास उपराष्ट्रपती माइक पेन्स यांच्याकडे सत्ता जाऊ शकते. जर पेन्सही आजारी पडले तर हाउस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांना कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष करता येतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us election Who will go to power if Donald Trump illness worsens