
वॉशिंग्टन - अमेरिकेतील कॅपिटॉल इमारतीत बुधवारी झालेल्या हिंसाचाराला अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार असल्याचा आरोप बराक ओमाबा, जॉर्ज डब्ल्यू बुश, बिल क्लिंटन आणि जिमी कार्टर या अमेरिकेच्या चार माजी अध्यक्षांनी केला. तसेच ट्रम्प समर्थकांच्या कृत्याचा निषेध करीत सत्तेचे हस्तांतर शांततेत व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कॅपिटॉलच्या हिंसाचारानंतर काही तासांतच या चार माजी अध्यक्षांनी एक निवेदन प्रसिद्ध केले. ‘कॅपिटॉल’मध्ये इमारतीत घडलेल्या हिंसेची इतिहासात नोंद घेतली जाईल. कायदेशीर मार्गाने झालेल्या निवडणुकीबद्दल सत्ताधीशाने सातत्याने खोटारडी वक्तव्ये केली असून त्यांना कोणताही आधार नाही. हा क्षण आपल्या देशासाठी लज्जास्पद व अपमानास्पद आहे, असे यात म्हटले आहे. ही चीड अनेक वर्षांपासून खदखदत होती आणि आता ती हिंसेच्या रूपात पाहायला मिळत असल्याचेही ओबामा म्हणाले आहेत.
मागील दोन महिन्यांपासून देशातील एक मोठा राजकीय पक्ष आणि त्याच्यासोबत असणारी प्रसारमाध्यमे त्यांच्या पाठीराख्यांना सत्य दाखवण्यापासून दूर पळत आहेत. ही निवडणूक अटीतटीची झालेली नाही हे सत्य आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष ज्यो बायडेन हे २० जानेवारी रोजी अध्यक्षपदाची शपथ घेणार आहे. त्यांच्या रंजक कहाण्या सत्यापासून खूप दूर नेणाऱ्या आहेत, असे ओबामा यांनी या पोस्टमध्ये म्हटले.
लोकशाहीच्या सदनाला भ्रष्ट करून रिपब्लिकन नेत्यांनी निवडलेला पर्याय दाखवून दिला आहे. ते याच मार्गाने जाऊ शकतात आणि आगीत तेल ओतू शकतात किंवा त्यांनी सत्य स्वीकारून या हिंसाचाराची धग शांत करण्याचे पहिले पाऊल उचलावे आणि अमेरिकेसोबत असल्याचे त्यांनी दाखवून द्यावे, असे आवाहनही ओबामा यांनी केले.
ही राष्ट्रीय दुर्घटना
ही राष्ट्रीय दुर्घटना आहे. या आपत्तीतून बाहेर पडून आपल्या देशाच्या कायद्यांचे शांततेत पाल करण्यासाठी आपण निश्चित एकत्र येऊ, असा विश्वास मला वाटतो, असे माजी अध्यक्ष जिमी कार्टर म्हणाले.
विषारी राजकारणाचा परिणाम
‘‘आपल्या ‘कॅपिटॉल’वर , आपल्या घटनेवर आणि आपल्या देशावर अभूतपूर्व हल्ला हा चार वर्षांच्या विषारी राजकारणाचा परिणाम आहे. व्यवस्थेत अस्वस्थता निर्माण करणे आणि अमेरिकन नागरिकांना एकमेकांविरोधात उभे करण्याचे काम या काळात झाले. आजच्या हिंसाचाराचा निषेध करीत पान उलटणे आवश्यक आहे,’’ असे आवाहन माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी केले.
कायद्याचे समर्थन
सरकारबाबत आज जो गोंधळ घालण्यात आला तो अविश्वसनीय आणि उद्वेगजनक आहे. कायद्याचे समर्थन करण्याची प्रत्येक अमेरिकी नागरिकाची मूलभूत जबाबदारी असल्याचे माजी अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी सांगितले.
‘बायडेन यांना पाठिंबा द्या’
ट्रम्प यांच्या पक्षातील अनेकांना बळजबरीने बोलायला भाग पाडण्यात आले, हे पाहून मला दु:ख झाले. त्यांच्या या बोलण्यामधून रिपब्लिकनच्या नेतृत्वाखाली देशाची काय अवस्था झाली आहे, हे दिसून येत आहे. जॉर्जियासारख्या राज्यांमधील स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्यास नकार देत पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, यावरूनही देशाच्या परिस्थितीचा अंदाज येतो. आपण कोणत्या पक्षाचे आहोत याचा विचार न करता एक अमेरिकन म्हणून आपली समान ध्येय पूर्ण करण्याचे काम करण्यासाठी ज्यो बायडेन यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे, असे भावनिक आवाहनही ओबामा यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.