अमेरिकेच्या स्वयंभू गुरुला 120 वर्षांची जेल; महिलांचे करायचा लैंगिक शोषण

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 28 October 2020

अमेरिकेतील एक स्वयंभू गुरु सेक्स गुलामांसारखे एक रॅकेट आणि पंथ चालवल्याप्रकरणी दोषी आढळला आहे.

न्यूयॉर्क- अमेरिकेतील एक स्वयंभू गुरु सेक्स गुलामांसारखे एक रॅकेट आणि पंथ चालवल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. न्यूयॉर्क न्यायालयाने मंगळवारी त्याला 120 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे 60 वर्षीय स्वयंभू गुरु केनेथ रेनेर जन्मभर तुरुंगात राहणार आहे. सेल्फ हेल्प ग्रुप सोसायटी चालवण्याच्या नावाखाली महिलांसोबत बळजबरी केल्याप्रकरणी तो दोषी आढळला आहे. 

केनेथ Nxivm नावाच्या संघटनेचा प्रमुख आहे. या संस्थेच्या माध्यमातून केनेथ श्रीमंत आणि प्रभावशाली महिलांना आकर्षित करायचा आणि त्यांच्यासोबत जबरदस्तीने सेक्स करायचा. केनेथ पाच दिवसाच्या सेल्फ हेल्प कोर्ससाठी अनुयायांकडून 5000 डॉलर घ्यायचा. केनेथ अनेक भक्तांचे आर्थिक आणि लैंगिक शोषण करायचा. तो भक्तांना कठोर नियम पाळायला भाग पाडायचा. 

याला काय म्हणावं! फ्रान्समध्ये नाही पाकचा राजदूत; तरी त्याला परत बोलावण्याचा...

केनेथने याच सेल्फ हेल्प ग्रुप शिवाय एक DOS नावाचे संघटन बनवले होते. तो या संघटनेता प्रमुख होता. या संघटनेत केनेथ सोडून सर्व सदस्य महिला होत्या. संघटनेला त्याने पिरॅमिड टाईप स्ट्रक्चर दिले होते. यात महिला गुलाम होत्या. या महिलांना जबरदस्तीने सेक्स करण्यासाठी भाग पाडलं जायचं. गुलाम महिलांना काही खाजगी फोटो दाखवून ब्लॅकमेल केले जायचं. काहींना प्राण्यांसारखे ठेवले जायचे, जेणे करुन इतर सदस्य घाबरतील. 

कोर्टाने 2019 च्या जूनमध्ये केनेथला सात प्रकरणामध्ये दोषी ठरवलं होतं. त्याच्यावर सेक्स रॅकेट चालवणे, सेक्स ट्रॅफिकिंग, अत्याचार, षडयंत्र आणि एका 15 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. पीडित महिलेने कोर्टासमोर सांगितले होते की, मी लहान असतानाच माझे लैंगिक शोषण सुरु करण्यात आले होते. 

मंगळवारी 15 जणांनी, ज्यात 13 महिला होत्या, ब्रुकलिन कोर्टमध्ये आपला जबाब नोंदवला आहे. 90 पेक्षा अधिक पीडित महिलांनी न्यायमूर्ती निकोलस ग्राफुइस यांना चिठ्ठी लिहून आपबिती सांगितली आहे.  Nxivm ला सेक्स रॅकेट चालवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. केनेथने 1998 मध्ये या संघटनेची स्थापना केली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US Guru Keith Raniere Guilty Jailed For 120 Years Nxivm