esakal | चीन, इटली नव्हे, हा देश होईल कोरोनाचे केंद्रबिंदू; WHOचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

WHO

जगभरात काय घडले?
जगात सर्वाधिक फटका इटलीला, मृतांची संख्या साडे सहा हजारांवर
इटलीपाठोपाठ स्पेनमध्येही कोरोनाचा हाहाकार
फ्रान्समध्येही मृतांची संख्या एक हजारावर 
युरोपवर दुसऱ्या महायुद्धानंतरच सर्वांत मोठं संकट 
चीनमधील परिस्थितीत सुधारणा, हुबेई प्रांतात नव्यानं लागण नाही 
सर्वाधिक फटका बसलेल्या वुहान शहरात संचारबंदी शिथील

चीन, इटली नव्हे, हा देश होईल कोरोनाचे केंद्रबिंदू; WHOचा इशारा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जनिव्हा : (Coronavirus):कोरोना व्हायरसने सध्या चीन, इराण, इटली, स्पेन असा प्रवास सुरू केला असताना जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) वेगळाच इशारा दिलाय. येत्या काही दिवसांत अमेरिका हा देश कोरोना व्हायरसचा केंद्र बिंदू होईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. त्यामुळं अमेरिकेची चिंता वाढली आहे. अमेरिकेत नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण होण्याचा वेग लक्षात घेऊन हा इशारा देण्यात आलाय. 

युरोप, अमेरिकेत वेगानं प्रसार
सध्याच्या घडीला कोरोनो व्हायरसचा प्रसार युरोप आणि अमेरिकेत वेगानं होत आहे. इटलीतील परिस्थितीत गेल्या दोन दिवसांत थोडी दिलासादायक असली तरी, स्पेनमध्ये जवळपास 47 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, अमेरिकेत 54 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळं अमेरिकेतही होम क्वारंटाईनच्या सूचना दिल्या जाऊ लागल्या आहेत. अमेरिकाही लॉक डाऊनच्या दिशेने जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या संदर्भात संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरीस यांनी काही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार गेल्या 24 तासांत जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांपैकी 85 टक्के केसेस ह्या युरोप आणि अमेरिकेतील आहेत, असे त्यांनी सांगितले. अमेरिकेत खूप वेगाने या व्हायरसचा प्रसार होत आहे. अमेरिकेत परिस्थिती बिकट होईल, असे थेट सांगता येत नाही. पण, होऊ शकते, असे सध्याचे चित्र असल्याचे मार्गारेट यांनी सांगितले. 

रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ
अमेरिकेत 4 मार्चपासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यादिवशी 23 टक्क्यांनी कोरोना रुग्ण वाढले होते. चिंताजनक बाब ही की 18 आणि 19 मार्चच्या दरम्यान कोरोना बाधितांची संख्या 51 टक्क्यांनी वाढली. अमेरिकेत सध्या विदेशात जाऊन न आलेल्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. प्रशांत महासागरात तैनात करण्यात आलेल्या नौदलाच्या थियोडोर रुझवेल्ट जहाजावर तीन सैनिकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय. अमेरिकी नौदलाचं हे मोठं जहाज असून, सध्या त्या जहाजावर 5 हजार नौसैनिक तैनात आहेत. त्यामुळं अमेरिकेच्या चिंतेत भर  पडलीय. अमेरिकेत बुधवारी सकाळपर्यंत 54 हजार 808 जणांना लागण झाली असून, आतापर्यंत 784 जण मृत्यूमुखी पडले आहेत. 

जगभरात काय घडले?
जगात सर्वाधिक फटका इटलीला, मृतांची संख्या साडे सहा हजारांवर
इटलीपाठोपाठ स्पेनमध्येही कोरोनाचा हाहाकार
फ्रान्समध्येही मृतांची संख्या एक हजारावर 
युरोपवर दुसऱ्या महायुद्धानंतरच सर्वांत मोठं संकट 
चीनमधील परिस्थितीत सुधारणा, हुबेई प्रांतात नव्यानं लागण नाही 
सर्वाधिक फटका बसलेल्या वुहान शहरात संचारबंदी शिथील