आनंदाची बातमी! Pfizer आणि BioNTech च्या कोरोना लशीचे रिझल्ट हाती

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 9 November 2020

कोरोना लशीची निर्मिती करणाऱ्या फाइझर (Pfizer) आणि BioNTech कंपन्यांनी आनंदाची बातमी दिली आहे.

वॉशिंग्टन- कोरोना लशीसंदर्भात मोठी बातमी समजत आहे. कोरोना लशीची निर्मिती करणाऱ्या फाइझर (Pfizer) आणि BioNTech कंपन्यांनी आनंदाची बातमी दिली आहे. लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमधून चांगले परिणाम दिसून आल्याचे कंपन्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोविड लस 2020 च्या शेवटापर्यंत मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फाइझरचे अध्यक्ष आणि सीईओ अल्बर्ट बोरला यांनी म्हटलं की, आमच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निकाल हाती आले आहेत. यातून लस 90 टक्के प्रभावी असल्याचे स्पष्ट होत आहे. 

केंद्र सरकारमुळेच काश्मीरी तरुणांनी हाती शस्त्रे घेतली; मेहबुबा मुफ्तींची टीका

कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यानंतर वैज्ञानिकांना सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. अभ्यासानुसार, ज्या स्वयंसेवकांना कोरोना लशीचा डोस देण्यात आला होता, त्यांच्यामध्ये 28 दिवसानंतरही विषाणू विरोधातील प्रतिकारशक्ती दिसून आली आहे. Pfizer चे वरिष्ठ अधिकारी डॉ. बिल ग्रूबर यांच्या म्हणण्यानुसार, आपण आता अशा जागी उभे आहोत, जेथून लोकांना आशा दाखवू शकतो. 

Pfizer ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी ठरल्याने लस डिसेंबरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Pfizer च्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती की, 2020 मध्ये 5 कोटी, तर 2021 पर्यंत 1.3 अब्ज डोस तयार करण्याची तयारी आहे. दरम्यान, जगभरातील देश कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. अनेक कंपन्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेत आहे. त्यांचे निकाल लवकरच हाती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताच्या तीन कोरोना लशी चाचणीच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US pharmaceutical giant Pfizer and German biotech firm BioNTech coronavirus vaccine