निवडणुकीआधी आयकर बुडवणाऱ्या ट्रम्प यांचा केसांवरचा खर्च थक्क करणारा!

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 28 September 2020

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 च्या निवडणुकीपूर्वी आपला आयकर (income tax) भरला नसल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 च्या निवडणुकीपूर्वी आपला आयकर (income tax) भरला नसल्याचे समोर आले आहे. त्यांनी 15 वर्षांपैकी 10 वर्ष आपला आयकर भरला नाही. 2016 साली म्हणजे निवडणुकीपूर्वी त्यांनी 750 डॉलरचा आयकर भरला, त्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये गेल्यानंतर 2017 साली 750 डॉलरचा आयकर भरला.  द न्यूयॉर्क टाईम्सने सोमवारी यासंदर्भातील माहिती दिली. ट्रम्प यांच्या मागील 20 वर्षांचा आयकरासंबंधी माहिती एका वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली होती. 

राज कपूर, दिलीपकुमारांची हवेली, पाकिस्तान सरकार खरेदी करणार

न्यूयॉर्क टाईम्सने डोनाल्ड ट्रम्प यांच्या आयकर संबंधीच्या माहितीचा अभ्यास केला. त्यात असे दिसून आले की, ट्रम्प यांनी 2016 पूर्वी 15 पैकी 10 वर्षात आयकर भरलेला नाही. निवडणुकीच्या पुढेपुढे 2016 आणि 2017 साली ट्रम्प यांनी प्रत्येकी 750 डॉलरचा आयकर भरला. ट्रम्प यांनी आयकर भरला नसल्याची माहिती समोर आल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे. 

न्यूयॉर्क टाईम्सला प्रतिक्रिया देताना ट्रम्प संस्थेचे वकील अॅलन गार्टेन म्हणाले की, माध्यमांमध्ये चुकीची माहिती दाखवण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून ट्रम्प यांनी नियमित आयकर भरला आहे. ट्रम्प यांनी लाखो डॉलरचा खाजगी आयकर सरकारकडे भरला आहे. 2015 पासून त्यांचा आयकर सुरळीत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनीही या माहितीवर भाष्य केलं असून बातमी पूर्णपणे खोटी असल्याचं ते म्हणाले आहेत. मी कर भरला आहे. सध्या माझ्या कर प्रकरणाचे ऑडिट होत आहे. त्यानंतर खरी माहिती समोर येईल, असं ते म्हणाले आहेत. आयकर विभागाने Internal Revenue Service मला चांगल्यारितीची वागणूक दिली नाही. आयकर विभागातील लोकांनी मला खूप वाईट वागणूक दिली, असा आरोप त्यांनी केला आहे. 

बिहारमध्ये आरजेडी आणि काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला?

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या उद्योगांसंबंधीची कागदपत्रे जाहीर करण्यास नकार दिलाय. 1970 पासून डोनाल्ड ट्रम्प पहिले असे राष्ट्रपती ठरले आहेत, ज्यांनी आपली आयकर माहिती सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे. कायद्यानुसार अशी माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक नाही. 

ट्रम्प यांनी आपला आयकर भरला नसल्याची बातमी चर्चत असताना आणखी एका माहितीने लोकांचे लक्ष वेधले आहे. ट्रम्प यांनी रिअॅलिटी शो होस्ट करत असताना आपल्या केसांवर तब्बल 70,000 डॉलर खर्च केला असल्याची माहिती बॉम्बशेल रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्याकडे आयकर भरण्यासाठी पैसा नव्हता, पण केसांची स्टाईल करण्यासाठी पैसा होता का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. दरम्यान, 3 नोव्हेंबर रोजी अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीला 35 दिवसांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे. या काळात नेत्यांना अडचणीच्या ठरु शकतील अशा बातम्या समोर येण्याची शक्यता आहे. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US President Donald Trump did noy pay income tax for 10 of 15 years before 2016 polls