डोनाल्ड ट्रम्प यांना रेमडेसिवीरचा दुसरा डोस; प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी दिली माहिती

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 4 October 2020

अमेरिकीचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना रेमडेसीवीरचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकीचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना रेमडेसीवीरचा दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यांची किडणी आणि लिव्हर योग्यरितीने काम करत आहे. त्यांना सोमवारी सकाळपर्यंत व्हाईट हाऊसला सोडण्यात येईल, अशी माहिती ट्रम्प यांच्या मेडिकल टीमने दिली आहे. ट्रम्प यांना शुक्रवारपासून ताप आलेला नाही. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात आलं आहे.  

74 वर्षीय ट्रम्प यांच्यावर वॉल्टर रिड वैद्यकीय केंद्रात उपचार सुरू आहेत. त्यांनी शनिवारी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाविरुद्धची लढाई लढताना मला आणखी बरे वाटत आहे, पण पुढील काही दिवस खऱ्या कसोटीचे असतील. मी येथे आलो, कारण मला बरे वाटत नव्हते. आता मला आणखी बरेच चांगले वाटत आहे. मी पूर्णपणे बरा होऊन परतावे म्हणून आम्ही सारे कसून प्रयत्न करीत आहोत. ज्या धडाक्यात प्रचार सुरू केला त्याच पद्धतीने सांगता करण्यास मी आतुर आहे. पुढील काही दिवसांत काय घडते ते आपण पाहूयात.

मुलांच्या मदतीला सोनू सूद आला धावून ; ऑनलाइन अभ्यासासाठी बसवला मोबाईल टॉवर

बरे होण्यासाठी बेडरूममध्ये स्वतःला गुरफटून घेण्याऐवजी रुग्णालयातून काम करण्याशिवाय आपल्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. जगातील अनेक देशांच्या नेत्यांनी पाठवलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांनी आभार मानले. आम्ही कशातून जात आहोत याची त्यांना कल्पना आहे, असेही ते म्हणाले.
रुग्णालयातील विशेष कक्षात ट्रम्प यांना व्हाइट हाउससारख्याच सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे ते नेहमीसारखे काम करू शकतात.

मला दोन पर्याय देण्यात आले. व्हाइट हाउसमध्येच थांबायचे. खोलीबाहेर पडायचे नाही. अगदी कार्यालयातही जायचे नाही. विश्रांतीचा आनंद लुटायचा. तसे केले असते तर मी एकाही व्यक्तीला भेटू शकलो नसतो. अध्यक्षपदाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन तसा नाही, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

व्हिडिओ केव्हाचा

या व्हिडिओवर तारीख नाही. त्यामुळे तो नेमका केव्हा घेण्यात आला हे स्पष्ट नाही. त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी जास्त आशावादी माहिती दिली होती. व्हिडिओवरून मात्र तसे जाणवले नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US President Donald Trump medical team says about his health