डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना टेस्ट रिपोर्टची प्रतिक्षा; पत्नीसह स्वत: झाले क्वारंटाइन

सकाळ वृत्तसेवा
Friday, 2 October 2020

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांची रंगत वाढत असतानाच आता ट्रम्प यांना क्वारंटाइन व्हावं लागलं आहे. त्यांची खासगी सल्लागार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं आहे. 

वॉशिंग्टन - अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांची रंगत वाढत असतानाच आता ट्रम्प यांना क्वारंटाइन व्हावं लागलं आहे. त्यांची खासगी सल्लागार कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांनी स्वत:ला क्वारंटाइन केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची खासगी सल्लागार होप हिक्सला कोरोना झाल्याच समोर आलं. कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर हिक्सने टेस्ट केली होती. 

होप हिक्स अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत एअर फोर्स वनमधून नेहमीच प्रवास करते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रेसिडेन्शियल डिबेटमध्येही होप हिक्स हिच्यासह इतर वरिष्ठ सहकारी उपस्थित होते. व्हाइट हाउसने म्हटलं की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प त्यांच्या आणि अमेरिकेची सेवा करणाऱ्या लोकांचे आरोग्य आणि सुरक्षेकडे गांभीर्याने पाहतात. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून माहिती देताना म्हटलं की, होप हिक्स यांना कोरोना झाला आहे. हिक्स न थांबता मोठ्या कष्टाने काम करते. तिची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर माझी आणि मेलानियाची कोरोना टेस्ट केली असून रिपोर्टची प्रतिक्षा करत आहे. दरम्यान, आम्ही स्वत:ला क्वारंटाइन केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

हे वाचा - लस निवडणुकीपूर्वी नाहीच; मॉडर्नाचा ट्रम्पना धक्का |

ट्रम्प यांची खासगी सल्लागार असलेली होप हिक्स प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम केल्यानंतर यंदाच व्हाइट हाऊसमध्ये परतली होती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची खासगी सल्लागार म्हणून तिची नियुक्ती करण्यात आली होती. याआधी तिने व्हाइट हाऊसमध्ये इतर जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत. 2016 मध्ये ट्रम्प यांच्या मोहिमेची होप हिक्स प्रवक्ता होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: us president donald trump wait for covid 19 test report