अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प "रॉकी'च्या रूपात 

वृत्तसंस्था
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

सिल्वेस्टर स्टॅलोन यांच्या "रॉकी' या चित्रपट मालिकेने 80 च्या दशकात जगभरात धूम उडवून दिली होती. आज अनेक वर्षांनंतर याचे नाव चर्चेत आले आहे. याचे कारण आहेत दस्तुरखुद्द डोनाल्ड ट्रम्प.

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत ट्‌विटर हॅंडलवरून एक छायाचित्र शेअर केले आहे, ज्यात बॉक्‍सर रॉकी बाल्बोआच्या छायाचित्राच्या जागी त्यांनी स्वतःचे छायाचित्र लावले आहे. बलदंड शरीराचे "ट्रम्प रॉकी' यांचे छायाचित्र पाहून सोशल मीडियावर ते ट्रोल झाले. 

सिल्वेस्टर स्टॅलोन यांच्या "रॉकी' या चित्रपट मालिकेने 80 च्या दशकात जगभरात धूम उडवून दिली होती. आज अनेक वर्षांनंतर याचे नाव चर्चेत आले आहे. याचे कारण आहेत दस्तुरखुद्द डोनाल्ड ट्रम्प. "रॉकी' मालिकेतील चौथ्या भागातील चित्रपटाचा नायक सिल्वेस्टर स्टॅलोन यांच्या पोस्टरवरील मूळ छायाचित्रात फोटोशॉपच्या आधारे फेरफार करीत ट्रम्प यांनी स्वतःचा चेहरा चिकटवला आहे. म्हणजे रॉकीच्या कमावलेल्या शरीरावर ट्रम्प यांचा चेहरा आहे. हा चित्रपट 1982 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात स्टॅलोन यांनी बॉक्‍सर रॉकी बाल्बोआ हे पात्र साकारले होते. 

ट्रम्प समर्थकांनी या छायाचित्राचे कौतुक केले आहे. व्हाइट हाउसमध्ये योद्धा राहत आहे, असे सांगत आमचे जगज्जेते असल्याबद्दल आभारही मानले आहे. कामकरी, करदाते, घटनेच्या समर्थनार्थ, देव-धर्म, मध्यम वर्गीय आणि नोकरदार, देशाभिमानी अशा सर्व अमेरिकी नागरिकांसाठी ट्रम्प यांनी जो लढा देत आहेत, तसा आत्तापर्यंत एकाही अध्यक्षाने दिला नव्हता, असे एका संकेतस्थळाने म्हटले आहे. ट्रम्प हे "आत्मपूजक' व "भ्रामक' आहेत, असे त्यांच्या टीकाकाराने म्हटले आहे. अभिनेते सिल्वेस्टर स्टॅलोन यांनी "मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर प्रेम करतो', असे ट्‌विट केले आहे. 

महाभियोगाशी संदर्भ 
डोनाल्ड ट्रम्प यांनी या छायाचित्राखाली त्यांनी कोणत्याही ओळी लिहिलेल्या नाहीत. मात्र येथील प्रसारमाध्यमांनी याचा संदर्भ महाभियोगाशी जोडला आहे. अमेरिकेच्या कॉंग्रेसने मात्र ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग दाखल केला असून, त्यांची चौकशी सुरू आहे. या वादग्रस्त परिस्थितीला तोंड देण्यास सक्षम असल्याचे दाखविण्यासाठी ट्रम्प यांनी हा खटाटोप केला आहे, असे मानले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US President Trump as Rocky