इराणवर अमेरिकेचे एकतर्फी निर्बंध; अनेक संस्था आणि व्यक्तींची संपत्ती गोठवली

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 22 September 2020

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर संयुक्त राष्ट्रांनी २०१५ ला काढून घेतलेले शस्त्र निर्बंध एकतर्फी लागू केले आहेत.

वॉशिंग्टन- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर संयुक्त राष्ट्रांनी २०१५ ला काढून घेतलेले शस्त्र निर्बंध एकतर्फी लागू केले आहेत. तसेच, इराण आणि इराणशी संबंधित व्यक्ती आणि संस्थांवरही ट्रम्प यांनी निर्बंध लादले आहेत. इराणने शांतता कराराचा भंग केल्याचा आरोप करत अमेरिकेने ही कारवाई केली आहे.

मोदी सरकार उलथून टाकण्यासाठी दिल्ली दंगल; चार्जशीटमध्ये दावा

इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध विकोपाला गेल्याचे हे निदर्शक मानले जात आहे. अमेरिकेने इराणला लक्ष्य करताना इराणचे संरक्षण मंत्रालय, अणुऊर्जा केंद्र आणि अनेक वरीष्ठ अधिकाऱ्यांवर निर्बंध जारी केले आहेत. ‘‘आज आम्ही इराणविरोधात कठोर कारवाई करत आहोत. अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्र तयार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आमचे सरकार कधीही इराणच्या हातात अण्वस्त्रे पडू देणार नाही,’’ असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांनी पूर्वी लागू केलेले निर्बंध पुन्हा एकदा अमलात आणण्यासाठी अध्यादेश काढला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अमेरिकेच्या या एकतर्फी कारवाईला संयुक्त राष्ट्रांबरोबरच २०१५ च्या शांतता करारातील इतर सहभागी देशांचाही विरोध आहे. मात्र, अमेरिकेचे निर्बंध संयुक्त राष्ट्रांच्या सर्व सदस्य देशांनी पाळावेत, असा धमकीवजा इशारा अमेरिकेने दिला आहे.

अमेरिकेच्या निर्बंधांनुसार, इराणला शस्त्रे पुरविणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा देशाची अमेरिकेतील मालमत्ता गोठवली जाणार आहे. तसेच, इराणच्या अधिकाऱ्यांना तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य पुरविणाऱ्यांवरही अशीच कारवाई केली जाणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांचा खर्च ऐकून व्हाल थक्क!

इराणने त्यांच्या अणु कार्यक्रमाबाबत कायमच खोटी माहिती जगाला दिली आहे. इराण अण्वस्त्रे तयार करत असताना जग शांत बसू शकत नाही. म्हणूनच आम्ही इराणवर निर्बंध लादत आहोत. हा इराणला आणि त्यांच्या बाजूने उभे राहणाऱ्या देशांना कडक इशारा आहे, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

निकोलस माडुरो यांच्यावरही निर्बंध

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस माडुरो यांच्यावरही अमेरिकेने निर्बंध जारी केले आहेत. इराणच्या अनेक अधिकाऱ्यांना शस्त्र निर्बंध मोडण्यात व्हेनेझुएलाने मदत केली असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे. तुम्ही कोणीही असा, इराणवरील शस्त्र निर्बंधांचा भंग केल्यास तुमच्यावरही निर्बंध लादले जातील, अशी धमकीही अमेरिकेने यावेळी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: US unilateral sanctions on Iran Frozen the assets of many organizations and individuals