esakal | Coronavirus : अमेरिकेचा चीनवर गंभीर आरोप, ट्रम्प म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus : अमेरिकेचा चीनवर गंभीर आरोप, ट्रम्प म्हणाले...

चीनबद्दल मला प्रचंड आदर आहे, त्या देशाचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत. मात्र कोरोनाच्या विषाणूचा उगम चीनमध्ये झाला हे दुर्दैवी असून, त्यानंतर हा विषाणू नियंत्रणाबाहेर गेला. 
- डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष 

Coronavirus : अमेरिकेचा चीनवर गंभीर आरोप, ट्रम्प म्हणाले...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसच्या उद्रेकाशी संबंधित ‘डेटा’ आपल्या तांत्रिक तज्ज्ञांना देण्यास चीनने उशीर केल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला. 

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी व्हाइट हाउसमधील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, की चीनकडून आम्हाला तातडीने स्पष्टीकरण हवे आहे. कोरोनामुळे संपूर्ण जगाला धोका असल्याचे सर्वांत प्रथम चीनला माहिती झाले होते, त्यामुळे त्याबाबतची माहिती तातडीने अमेरिकेचे शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांना पुरविण्याचे नैतिक बंधन चीनवर होते. ही माहिती प्राप्त करण्याचा जगाला अधिकार आहे. कोरोनाच्या उद्रेकानंतर त्या संदर्भातील माहिती प्राप्त करण्यासाठी तातडीने चीनमध्ये पाठविलेल्या तज्ज्ञांना माहिती देताना प्रत्येक टप्प्यावर चीनकडून विलंब करण्यात आला. कोरोनामुळे जगाला असलेला धोका ओळखण्यात त्यामुळे विलंब झाला आणि परिणामी जगभरातील नागरिकांचे आयुष्य धोक्यात आले. 

आम्ही कोणालाही दोष देत नाही, मात्र जगाला असलेल्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर माहितीचे आदान-प्रदान वेगाने झाले असते तर प्रत्येकाला पावले टाकण्यास सोपे गेले असते, असे पोम्पिओ म्हणाले. 

खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका 
कोरोनाच्या विरोधात अमेरिका टाकत असलेल्या पावलांची माहिती देतानाच अमेरिकेच्या प्रयत्नांबद्दल शंका निर्माण करणारी माहिती रशिया, चीन आणि इराणकडून पसरविली जात आहे, असा आरोपही पोम्पिओ यांनी केला. अमेरिकी नागरिकांनी सरकारी आणि खात्रीशीर माहिती स्रोतांवरच अवलंबून राहावे. तसेच, अमेरिकेच्या प्रयत्नांबाबत शंका निर्माण करणाऱ्यांवर विसंबून राहू नये, असेही ते म्हणाले. 

व्हाइट हाउसमधील व्यक्तीला कोरोनाची बाधा 
अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेन्स यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. कोरोनाचा संसर्ग झालेली ही व्हाइट हाउसमधील पहिली व्यक्ती ठरली आहे. अध्यक्ष ट्रम्प किंवा उपाध्यक्ष पेन्स यांच्या निकटच्या संपर्कात ही व्यक्ती आली नव्हती, असे व्हाइट हाउसने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पावले उचलण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मागील आठवड्यात ट्रम्प यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. 

ही लढाई अमेरिकेने जिंकली : ट्रम्प 
अमेरिकेत बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनाच्या विरोधातील लढाई आम्ही जिंकली आहे, अशी घोषणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. न्यूयॉर्क, इलिनॉईसपाठोपाठ कॅलिफोर्नियात शुक्रवारी टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील मोठी शहरे पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. 

चीनबद्दल मला प्रचंड आदर आहे, त्या देशाचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत. मात्र कोरोनाच्या विषाणूचा उगम चीनमध्ये झाला हे दुर्दैवी असून, त्यानंतर हा विषाणू नियंत्रणाबाहेर गेला. 
- डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष