लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये वापरा कॉपीराइट म्युझिक

वृत्तसंस्था
Friday, 18 September 2020

सध्या ही सुविधा फेसबुक गेमिंगबरोबर करार केलेल्या स्ट्रीमिंग कंपन्यांनाच उपलब्ध होणार असली तरी ती इतर छोट्या कंपन्यांनाही पुरविली जाणार असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. 

माउंटन व्ह्यू (अमेरिका) - फेसबुक गेमिंग कंपनीने नुकताच एक करार करत ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’मध्ये कॉपीराइट असलेल्या म्युझिकचा वापर करण्यास त्यांच्या भागीदार स्ट्रीमर्सना परवानगी दिली आहे. यामुळे कॉपीराइट असलेल्या म्युझिकचा वापर करण्याबाबत कडक नियम असलेल्या ‘ट्वीच’सारख्या प्लॅटफॉर्मवर लाइव्ह स्ट्रीमिंग करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘ट्वीच’ हा प्लॅटफॉर्म ॲमेझॉन कंपनीने उपलब्ध करून दिला आहे. लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर करताना त्या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी त्यांची मालकी असलेले किंवा परवाना असलेले म्युझिक वापरणे बंधनकारक आहे. अनेक स्ट्रिमर पार्श्वसंगीत म्हणून कॉपीराईट असलेल्या म्युझिकचा वापर करतात, पण ते ‘ट्वीच’च्या नियमांच्या विरोधात आहे आणि जून महिन्यापासून अशा कार्यक्रमांवर कारवाई होत आहे. या पार्श्वभूमीवर फेसबुकने नवा करार करत स्ट्रिमरना मोठा दिलासा दिला आहे. याबाबत ब्लॉगद्वारे माहिती देताना फेसबुक गेमिंगने सांगितले की,‘‘आम्ही म्युझिक उद्योगाबरोबर भागीदारी करत असून आमच्या भागीदार असणाऱ्यांसाठी लोकप्रिय म्युझिकचा खजिनाच खुला करत आहोत. याचा वापर ते लाइव्ह स्ट्रीमिंगच्या वेळी करू शकतात. आम्ही युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप, वॉर्नर म्युझिक ग्रुप, सोनी म्युझिक एंटरटेन्मेंट, कोबाल्ट म्युझिक ग्रुप आणि इतर अनेक म्युझिक कंपन्यांचे सहकार्य घेत विविध प्रकारचे संगीत उपलब्ध करून देत आहोत.’’

देशभरातील  बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या ही सुविधा फेसबुक गेमिंगबरोबर करार केलेल्या स्ट्रीमिंग कंपन्यांनाच उपलब्ध होणार असली तरी ती इतर छोट्या कंपन्यांनाही पुरविली जाणार असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. म्युझिक वापरासाठी काही अटीही घालण्यात आल्या आहेत. तुम्ही प्रक्षेपित करत असलेला कार्यक्रम हा गेमिंगबद्दल हवा, म्युझिकबद्दल नको. गेमिंगचे प्रक्षेपण सुरु असताना म्युझिकवर भर नको, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use copyrighted music in live streaming