कोरोनाचे नियम न पाळल्यास होणार १० लाखांचा दंड; इंग्लंडनं उचललं कठोर पाऊल

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 20 September 2020

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव जगभरात वाढत आहे. या विषाणूला रोखण्यासाठी अनेक देश कठोर नियम बनवताना दिसत आहे.

लंडन- कोरोना महामारीचा प्रादुर्भाव जगभरात वाढत आहे. या विषाणूला रोखण्यासाठी अनेक देश कठोर नियम बनवताना दिसत आहे. इंग्लडने कोरोना महामारीला रोखण्यासाठी असाच एक कठोर नियम केला आहे. ज्या लोकांनी विलगीकरणात राहण्याचे नाकारले त्यांना तब्बल १३ हजार डॉलरचा (९ लाख ५५ हजार रुपये) दंड आकारला जाणार आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शनिवारी याबाबतचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे कठोर निर्बंध लादण्यात आल्याचे पंतप्रधान बोरिस जॉनसन म्हणाले. नॉर्थ-वेस्ट, नॉर्थ आणि सेंट्रल इंग्लंडमध्ये कोरोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे तेथे राहणाऱ्या लाखो लोकांच्या भल्यासाठी कठोर निर्बंध आवश्यक असल्याचे ते म्हणाले आहेत. 

विरोधकांच्या गोंधळातच राज्यसभेत कृषी विधेयक मंजूर

२८ सप्टेंबरपासून लोकांना या नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास किंवा राष्ट्रीय आरोग्य विभागाने तसे  सांगितले असल्यास व्यक्तीला विलगीकरणात राहणे आता कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आल्याचे बोरिस म्हणाले. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे सर्व नागरिकांनी सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी स्वत:ला विलगीकरणात ठेवणे, असंही ते म्हणाले. 

लोकांनी या नव्या नियमांकडे दुर्लक्ष करु नये. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी १ लाख ते १० लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. ज्या लोकांना कोरोनाची लक्षणे आहेत किंवा ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशा लोकांना १० दिवसासाठी विलगीकरणात राहावे लागेल, असंही पंतप्रधान म्हणाले आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला धोका? व्हाईट हाऊसमध्ये पाठवलं विषाचं पाकिट

कोरोना महामारीने इंग्लंडमध्ये थैमान घातले आहे. आतापर्यंत देशात ४२ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. युरोपातील देशांमध्ये सर्वाधिक मृत्यूंची नोंद इंग्लडमध्ये नोंदण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नव्याने निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, जॉनसन यांनी पुन्हा लॉकडाऊन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या सहा लोकांना एकत्र जमण्यावर बंदी घालण्यात आली आहे. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Violation of Corona rules will result in a fine of Rs 10 lakh The country took a drastic step