‘यूएन’विरोधातील आंदोलनाला हिंसक वळण; काँगोत भारताचे दोन जवान हुतात्मा

शांती सैन्यावर हल्ले : पाच जणांचा मृत्यू ; ५० जण जखमी
Violent agitation against UN Two Indian soldiers martyred in Congo
Violent agitation against UN Two Indian soldiers martyred in Congosakal

किन्शासा : काँगोमधील गोमा शहरात संयुक्त राष्ट्रांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागून त्यात आज भारताने पाठविलेल्या शांती सैन्यातील दोन जवान हुतात्मा झाले. या संघर्षात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला, तर ५० जण जखमी झाले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना हल्ला करणाऱ्यांना शिक्षा करण्याची मागणी केली आहे. काँगोचे सैन्य आणि येथील बंडखोर गटांमध्ये गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. येथे संयुक्त राष्ट्रांतर्फे सुमारे सोळा हजार शांती सैनिक तैनात आहेत. काँगोमधील संघर्ष थांबविण्यात शांती सैन्यालाही अपयश येत असल्याचा दावा करत आंदोलकांनी गोमा शहरात कालपासून (ता. २६) संयुक्त राष्ट्रांविरोधात निदर्शने सुरु केली आहेत.

त्यांनी काल शांती सैन्याच्या तळांवर जोरदार हल्ले केले. अनेक आंदोलकांनी या तळांवर दगडफेक केली आणि पेट्रोल बाँबही फेकले. आज त्यांनी जमावाने पुन्हा एकदा हल्ला करताना स्थानिक पोलिसांच्या हातातील बंदुका हिसकावून घेत शांती सैन्यावर गोळीबार केला. या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल सावळाराम विश्‍नोई आणि हेड कॉन्स्टेबल शिशुपाल सिंह या दोन भारतीय जवानांसह, दोन नागरिक आणि एक मोरोक्कोचा जवान यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते फरहान हक यांनी सांगितले.

काँगोमध्ये हुतात्मा झालेले दोन्ही भारतीय जवान हे सीमा सुरक्षा दलात सेवेत होते. भारतीय जवान आणि मोरोक्को देशाचे जवान तैनात असलेल्या तळावर सुमारे पाचशे आंदोलकांनी हल्ला केला. या आंदोलकांकडे पोलिसांकडून हिरावून घेतलेली शस्त्रे होती. स्वसंरक्षणार्थ भारत आणि मोरोक्कोच्या जवानांनी गोळीबार केला. मात्र, आंदोलकांच्या हल्ल्यात दोघे भारतीय जवान आणि मोरोक्कोचा एक जवान मारला गेला. भारताचे पथक दोन जूनपासून या भागात तैनात आहे.

सर्वाधिक योगदान भारताचे

संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमांमध्ये सर्वाधिक योगदान भारताचे आहे. आतापर्यंतत झालेल्या ७१ शांती मोहिमांपैकी ५१ मोहिमांमध्ये भारताने सहभाग घेतला आहे. आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक भारतीय जवानांनी शांती मोहिमांमध्ये सहभाग घेतला आहे. सध्याही १४ पैकी ८ शांती मोहिमांमध्ये भारताचे जवान तैनात आहेत. या मोहिमांमध्ये आतापर्यंत १६० भारतीय जवानांना हौतात्म्य आले आहे.

भारताच्या दोन धाडसी जवानांना हौतात्म्य आल्याने तीव्र दु:ख होत आहे. त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना पकडून कारवाई व्हायलाच हवी. जवानांच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे.

- एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com