
Martial law : विलीन प्रदेशांमध्ये ‘मार्शल लॉ’ लागू; व्लादिमीर पुतीन
मॉस्को : युक्रेनमधील विलीन करून घेतलेल्या चार प्रदेशांमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज ‘मार्शल लॉ’ लागू करत येथील अधिकाऱ्यांना अतिरिक्त अधिकार दिले आहेत. हा प्रदेश पूर्ण नियंत्रणात रहावा, यासाठीच पुतीन यांनी हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. रशियाने पूर्व युक्रेनमधील चार प्रदेश विलीन करून घेतले असले तरी त्यावर त्यांचे पूर्ण नियंत्रण नाही. शिवाय, युक्रेनकडून जोरदार प्रतिहल्ले होत असून काही भागांवर त्यांनी पुन्हा ताबा मिळविला आहे. या पार्श्वभूमीवर रशियाने तीव्र हल्ले सुरु करतानाच आता या प्रदेशांमध्ये मार्शल लॉ देखील लागू केला आहे. या अंतर्गत कोणती पावले उचलली जाणार, हे अद्याप स्पष्ट नसले तरी या प्रदेशांवर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना अधिक अधिकार देण्यात आले आहेत. ‘जनतेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आम्ही दीर्घकालिन उपाय योजत आहोत,’ असे पुतीन यांनी याबाबत घोषणा करताना सांगितले. युक्रेन युद्धाचा आजचा २३८ वा दिवस होता.
युक्रेनमधील ऊर्जा केंद्रांवर मारा
किव्ह : रशियाने आज युक्रेनमधील ऊर्जा केंद्रांना लक्ष्य करत बाँबफेक आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला. यामुळे दोन मोठ्या शहरांसह अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. युक्रेनला आणखी अडचणीत आणण्यासाठी रशियाने ऊर्जा केंद्रांवर हल्ले सुरु केले असल्याचा आरोपही युक्रेनने केला. रशियाने आज झॅपोरिझ्झिया शहराजवळील गावांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. यामुळे ऊर्जा केंद्र आणि पाणीपुरवठा केंद्राचे नुकसान झाले. युक्रेनच्या दक्षिण भागात असलेल्या क्रिव्ही या शहरावरही झालेल्या क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामुळे येथील गावे अंधारात बुडाली.
रशियाने गेल्या आठ दिवसांत युक्रेनमधील ऊर्जा केंद्रांना लक्ष्य केले असून आतापर्यंत एक तृतियांश ऊर्जा केंद्रे हल्ल्यात नष्ट झाल्याचे युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी ट्विट केले आहे.
खेरसनमधून स्थलांतर सुरु
युक्रेनकडून जोरदार हल्ले होण्याची शक्यता व्यक्त करत रशियाने त्यांनी ताब्यात घेतलेल्या खेरसन शहरातून नागरिकांना निघून जाण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनकडून हल्ला होण्याची शक्यता असून रशियादेखील माघार घेणार नाही. त्यामुळे नागरिकांनी शहर सोडून जाणे योग्य ठरेल, असा इशारा रशियाच्या सैन्याने दिला आहे. तसेच, हजारो नागरिकांना बाहेरही काढले जात आहे. या नागरिकांचे जाणीवपूर्वक विस्तापन केले जात असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. ताबा मिळविलेल्या प्रदेशातून नागरिकांना दुसरीकडे हलविणे, हा युद्धगुन्हा समजला जातो.