‘व्हॉयजेर-२’ सूर्यमालेबाहेर

वृत्तसंस्था
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या ‘व्हॉयजेर-२’ या यानाने तब्बल चार दशकांनंतर अंतराळ प्रवासाचा एक मोठा टप्पा गाठला आहे. आपल्या अफाट अशा सौरमालेची सीमा ओलांडून त्याने वेगळ्या आंतरतारकीय अवकाशात प्रवेश केला असल्याची घोषणा शास्त्रज्ञांनी आज केली.

वॉशिंग्टन - अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या ‘व्हॉयजेर-२’ या यानाने तब्बल चार दशकांनंतर अंतराळ प्रवासाचा एक मोठा टप्पा गाठला आहे. आपल्या अफाट अशा सौरमालेची सीमा ओलांडून त्याने वेगळ्या आंतरतारकीय अवकाशात प्रवेश केला असल्याची घोषणा शास्त्रज्ञांनी आज केली.

अमेरिकेतील लोवा विद्यापीठातील संशोधकांच्या मते ‘व्हॉयजेर-२’ या यानाने आंतरतारकीय अवकाशात प्रवेश केला असून, सौर वादळांपासून तयार झालेली आणि बुडबुड्यांसारखी दिसणारी सीमा त्याने ओलांडली आहे.

आपल्या सौरमालेच्या बाहेर पाऊल ठेवणारे हे यान दुसरी मानवनिर्मित वस्तू असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे, याआधी २०१२ मध्ये नासाच्या  ‘व्हॉयजेर-१’ या यानाने सौरकक्षेबाहेरील बाह्य अवकाशामध्ये प्रवेश केला होता. जर्नल ‘नेचर ॲस्ट्रोनॉमी’ या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये या संदर्भातील संशोधन विस्ताराने प्रसिद्ध झाले आहे. या यानाने ५ नोव्हेंबर २०१८ रोजी प्लाझ्मा वायूच्या प्रदेशात प्रवेश केला होता, या अंतराळ यानावरील प्लाझ्मा लहरी उपकरणामुळेच या यानाचा नेमका थांगपत्ता कळणे सहज शक्‍य झाले.

असेही मत
सध्या या यानाचा उष्ण प्रदेशातून प्रवास सुरू असल्याचे दिसून येते, कमी घनता असणारा प्लाझ्मा वायू हा सौर वादळाचे अस्तित्व दर्शवितो, तर उच्च घनतेचा प्लाझ्मा हे यान सौरमालेच्या बाहेर पोचले असल्याचे सांगते, असे संशोधकांनी नमूद केले. याआधी ‘व्हॉयजेर-१’ या यानाने सौरमालेच्या बाहेर पाऊल ठेवले होते. दरम्यान आपण सौरवादळापासून दूर गेलो याचा अर्थ आपण सौरमाला ओलांडली असा निष्कर्ष काढणेही चुकीचे असल्याचे मत लोवा विद्यापीठातील प्रो. डॉन गुरनेट्ट यांनी मांडले.

हेलिओस्फेअरबाबत माहिती मिळणार
विशेष म्हणजे ‘नासा’ने १९७७ मध्ये आठवडाभराच्या फरकानेच ‘व्हॉयजेर-१’ आणि ‘व्हॉयजेर-२’ या  यानांचे प्रक्षेपण केले होते. या दोन्ही यानांनी सौरमालेची कक्षा ओलांडली आहे. सौरवादळांचा विशेष प्रभाव असणाऱ्या हेलिओस्फेअरच्या रचनेबाबत या यानाने काही महत्त्वपूर्ण पुरावे दिले असून, सौरवादळाचा प्रभाव बाह्य अवकाशामध्येही कसा पोचतो, हे या माध्यमातून जाणून घेणे सोपे होईल, असे संशोधकांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: voyager 2 Outside the sun