वॉल्ट डिस्ने कंपनीने 28 हजार कर्मचाऱ्यांना दाखवला घरचा रस्ता

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 30 September 2020

वॉल्ट डिस्ने कंपनीने 28 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली.

न्यूयॉर्क- वॉल्ट डिस्ने कंपनीने 28 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली. स्थानिक कर्मचाऱ्यांना याचा फटका बसेल. यातील बहुतांश कर्मचारी अमेरिकेतील थीम पार्कमधील असून त्यातील 67 टक्के अर्धवेळ आहेत. जगातील शांघाय, हाँगकाँग, टोकियो आणि पॅरिस अशा इतर शाखांवर याचा परिणाम होणार नाही. कोरोना संसर्ग वाढल्यामुळे जुलैमध्ये दुसऱ्यांदा बंद करावे लागलेले हाँगकाँगमधील पार्क गेल्याच आठवड्यात उघडले.

कॅलिफोर्निया वगळता इतर सर्व थीम पार्क उघडण्यात आली आहेत, पण सोशल डिस्टन्सिंगच्या निर्बंधांमुळे पर्यटकांची संख्या मर्यादीत ठेवावी लागली आहे. तोटा होत असल्यामुळे कंपनीची स्थिती सुरळीत करण्यावर कंपनीने लक्ष केंद्रीत केले आहे.

दुर्गेची भूमिका साकारल्याने खासदार नुसरत जहाँ यांना जीवे मारण्याची धमकी 

कॅलिफोनिर्यामुळे फटका

कॅलिफोर्निया प्रांताच्या सरकारने कोरोनाचे निर्बंध अद्याप उठविलेले नाहीत. त्यामुळे तेथील डिस्नेलँड उघडणे शक्य झालेले नाही. यामुळे कंपनीच्या समस्या आणखी गंभीर बनल्या आहेत. कंपनीकडून सरकार दरबारी प्रयत्न सुरू आहेत.

85 टक्के घट

27 जूनपर्यंतच्या तीन महिन्यांत डिस्ने कंपनीला 4.7 अब्ज डॉलरचा तोटा झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीच्या तुलनेत उत्पन्नात 85 टक्के घट झाली आहे.

कोरोनाची जागतिक साथ किती दिवस चालेल हे अनिश्चित आहे. त्यामुळे थीम पार्क, अनुभूती तसेच उत्पादन अशा सर्वच पातळ्यांवर कर्मचारी कपात करण्याचा अत्यंत कठोर निर्णय घेणे आम्हाला भाग पडले आहे, असं पार्क विभागाचे अध्यक्ष जॉश डिअमारो म्हणाले आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the Walt Disney Company send home to 28000 employees