ब्रिटनचा सामना ‘धोकादायक काळा’शी; वैद्यकीय अधिकाऱ्यांचा इशारा

ब्रिटनचा सामना ‘धोकादायक काळा’शी; वैद्यकीय अधिकाऱ्यांचा इशारा

लंडन - कोरोना संसर्गाच्या काळातील सर्वांत धोकादायक आठवड्यांकडे ब्रिटनची वाटचाल सुरु असल्याने लवकरच देशाचा सामना सर्वांत धोकादायक काळाशी होणार आहे, असा इशारा इंग्लंडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी ख्रिस व्हिटी यांनी दिला आहे. तसेच, संसर्गाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे कठोरपणे पालन करत घरीच थांबावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. 

कोरोना काळात ख्रिस व्हिटी यांनी वारंवार नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केल्याने हे जनजागृती मोहिमेचा चेहराच बनले आहेत. ब्रिटनमध्ये दोन लसींचा वापर करून लसीकरण मोहिम सुरु आहे. तरीही देशाच्या आरोग्य यंत्रणेवर आताच प्रचंड ताण असून तो कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपला संपर्क कमी करून संसर्ग टाळणे हा आहे, असे व्हीटी यांनी म्हटले आहे. ‘हा देशवासीयांसाठी सर्वाधिक कठीण काळ असल्याचे सर्वांनीच मान्य केले आहे. आगामी काही आठवडे आणखीनच धोकादायक ठरणार असल्याने काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. कोणाबरोबरही अनावश्‍यक संपर्क झाल्यास तो विषाणूचा प्रसार होण्यास कारणीभूत ठरु शकतो,’ असे व्हीटी यांनी एका मुलाखतीवेळी सांगितले. 

गेल्या वर्षी कोरोनाचा कहर सुरु असताना एप्रिल महिन्यात इंग्लंडमध्ये १८ हजार जण रुग्णालयांत उपचार घेत होते. सध्या हीच रुग्णसंख्या ३० हजार इतकी आहे. ज्यांना या आकडेवारीमुळे धक्का बसला नसेल, त्यांना परिस्थितीचे गांभीर्य समजलेले नाही, असेच म्हणावे लागेल, असे व्हीटी यांनी म्हटले आहे. 

जपानमध्येही आढळला नवा प्रकार
टोकियो - ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका येथे कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्यानंतर आता जपानमध्येही नवा प्रकार आढळला असल्याचे या देशाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. ब्राझीलवरून आलेल्या चार व्यक्तींची तपासणी केली असता हा कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला असल्याचे सांगण्यात आले. या विषाणूचा अधिक अभ्यास सुरु आहे. ब्राझीलहून आलेल्या व्यक्तींपैकी चाळीशीत असलेल्या पुरुषाला श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या एका महिलेला डोकेदुखीचा त्रास होत होता. जपानमध्ये ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील विषाणूचा संसर्ग झालेले तीस रुग्ण आहेत. संसर्ग वाढल्याने टोकियोमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

जगातील बाधितांची संख्या ९ कोटींवर
बाल्टिमोर - जगभरातील कोरोना बाधितांच्या संख्येने ९ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांचाही संसर्ग वाढत असल्याने काही देशांनी, विशेषत: युरोपातील देशांनी नव्याने निर्बंध लागू केले आहेत. कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत वीस लाखहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या दहा आठवड्यांमध्येच दुप्पट झाली आहे.  सर्वाधिक संसर्ग आणि मृत्यू याबाबत अद्यापही अमेरिका सर्वांत पुढे आहे. आफ्रिका खंडातही बाधितांची संख्या ३ कोटींवर गेली असून यातील ३० टक्के बाधित एकट्या दक्षिण आफ्रिकेत आहेत. 

लस चोरी होण्याची द. आफ्रिकेला भीती
जोहान्सबर्ग -
 दक्षिण आफ्रिकेला भारताकडून येत्या काही आठवड्यांत कोरोनाप्रतिबंधक लसीचे १५ लाख डोस मिळणार आहेत. या लसींची चोरी होऊन त्या काळ्या बाजारात विकल्या जातील, अशी भीती सरकारला असून लस मिळताच लसींची साठवणूक गोपनीय ठिकाणी केली जाणार असल्याचे येथील माध्यमांनी सांगितले. काळ्या बाजारात या लसींना सर्वाधिक किंमत मिळण्याची शक्यता असल्याने त्यांची चोरी होऊ शकते. असे झाल्यास लसींची किंमतही प्रचंड वाढेल, अशी भीती दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागाचे प्रवक्ते पोपो माजा यांनी सांगितले. ‘देशात एका गोपनीय ठिकाणी लसींची सुरक्षितरित्या साठवणूक केली जाणार आहे,’ असे माजा म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com