esakal | सर्जिकल स्ट्राइकवर एकही प्रश्‍न नाही: नरेंद्र मोदी
sakal

बोलून बातमी शोधा

narendra modi

सर्जिकल स्ट्राइकवर एकही प्रश्‍न नाही: नरेंद्र मोदी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

जगाला दहशतवादाचा चेहरा दाखवण्यात यश

वॉशिंग्टन: दहशतवादाचा चेहरा जगाला दाखवून देण्यात भारत यशस्वी झाला असून, पाकिस्तानी भूमीवर पोसलेल्या दहशतवादाविरुद्ध सर्जिकल स्ट्राइक करण्याच्या देशाच्या महत्त्वपूर्ण निर्णयावर एकाही देशाने प्रश्‍न उपस्थित केला नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे नमूद केले.

भारताने वीस वर्षांपूर्वी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला होता; मात्र त्या वेळी जगातील अनेक देशांनी त्याकडे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेच्या नजरेतून पाहिले. त्या वेळी कोणीच त्याकडे दहशतवादाच्या दृष्टिकोनातून पाहिले नाही. आता दहशतवाद काय असतो हे दहशतवाद्यांनीच सर्व जगाला सांगितले आहे. त्यामुळे आता दहशतवाद काय असतो, हे जगाला सांगण्याची गरज उरलेली नाही, असे मोदी यांनी जगभरात वाढ झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा संदर्भ देत स्पष्ट केले.

सुमारे 600 भारतीय-अमेरिकी नागरिकांसमोर बोलताना मोदींनी 29 सप्टेंबर रोजी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांविरुद्ध सर्जिकल स्ट्राइक करून भारताने आम्ही आमच्या सार्वभौमत्वाचा बचाव आणि वेळ आल्यास सुरक्षा निश्‍चित करू शकतो, हे दाखवून दिले असल्याचे सांगितले.
भारताने सर्जिकल स्ट्राइक केला, त्या वेळी जगाला आपली ताकद कळाली आणि दहशतवादाचा सामना करताना भारत स्वत:चा बचाव करू शकतो, हे सगळ्या जगाने पाहिले, असेही मोदी यांनी नमूद केले. ते म्हणाले, की सर्जिकल स्ट्राइकनंतर जगाने भारताला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले असते; मात्र पहिल्यांदा भारताच्या या महत्त्वपूर्ण पावलाविषयी जगातील एकाही देशाने एकही प्रश्‍न उपस्थित केला नाही. सर्जिकल स्ट्राइकमुळे ज्यांना वेदना झाल्या, तो वेगळा भाग आहे, असा टोलाही त्यांनी पाकिस्तानला लगावला.

दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या वाढत्या हालचालींचा अप्रत्यक्षपणे संदर्भ देत मोदी म्हणाले, की ध्येय साध्य करण्यासाठी भारत जागतिक आदेश धुडकावून लावण्यावर विश्‍वास ठेवत नाही. भारताची ही परंपरा आणि संस्कृती आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय कायद्याने बांधलो गेलो आहोत. कारण हे आमचे व्यक्तित्व आणि प्रकृती आहे. आमच्यासाठी "वसुधैव कुटुंबकम' ही संकल्पना आहे. केवळ शब्द नाहीत.
भारत आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमांचे पालन करत असला, तरी आमच्या सार्वभौमत्व, सुरक्षा, शांतता, आमचे लोक आणि प्रगतीसाठी कठोर पावले उचलण्यातही सक्षम आहोत. ज्या वेळी आवश्‍यकता भासली, त्या वेळी आम्ही हे करून दाखवले आहे आणि आम्हाला रोखण्याची क्षमता जगामध्ये कधीच नसेल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

या वेळी त्यांनी आपल्या सरकारचे स्वच्छ चारित्र्य आणि विकासाची माहितीही अमेरिकेतील भारतीयांना दिली.

सुषमा स्वराज यांच्या कामाची प्रशंसा
सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा घेत असताना अमेरिकेतील भारतीय लोकांसमोर पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची प्रशंसा केली. स्वराज यांनी गेल्या 3 वर्षांच्या काळात परदेशामध्ये अडकलेल्या 80 हजार भारतीयांना सुखरूप मायदेशी परत आणले. सरकार परदेशामध्ये समस्यांनी ग्रासलेल्या भारतीयांची सतत मदत करत आहे, असे ते म्हणाले. सोशल मीडियाच्या खऱ्या ताकदीचा उपयोग सुषमा स्वराज यांनीच करून दाखवला आहे. जर कुणी परदेशातून ट्‌विट केले, तर परराष्ट्रमंत्र्यांनी 15 मिनिटांत उत्तर दिले आहे आणि 24 तासांत सरकारने काहीना काही हालचाली सुरू केल्या आहेत, असेही मोदी यांनी सांगितले.

loading image
go to top