
‘यूएई’मध्ये पावसाचे सात बळी; मुसळधार पावसामुळे पूर
दुबई : संयुक्त अरब अमिरातीच्या उत्तर आणि पूर्व भागात दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. अंतर्गत मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मृत नागरिक विविध आशियातील देशातील रहिवासी आहेत. अंतर्गत मंत्रालयाचे अलम सलेम अल तुनैजी यांनी म्हटले, की पावसामुळे असंख्य लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले होते. त्यापैकी ८० टक्के नागरिक घरी परतले आहेत. अजूनही पूरग्रस्त भागात बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. दोन दिवसांपूर्वी उत्तर आणि पूर्व संयुक्त अरब अमिरातीला मुसळधार पावसाने झोडपून काढले.
त्यामुळे फुजैराह, रास अल खैमाह आणि शारजासह अनेक भागात पूर आला. या भागातील ८७९ जणांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मंत्रालयाने विविध हॉटेलमधील ८२७ खोल्या ताब्यात घेतल्या असून त्यात १८८५ जणांना आश्रय दिला आहे. यूएईच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, फुजैराह येथे गेल्या २७ वर्षात जुलैत सर्वाधिक पावसाची नोंद झाली. पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहेत. अनेक आलिशान गाड्या पाण्यात वाहून गेल्या. बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. पावसामुळे अनेक रस्ते खराब झाले आहेत. सैनिकांच्या गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे. दरम्यान, इराणमध्ये देखील मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे आतापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. असंख्य लोक बेपत्ता झाले आहेत. स्थानिक प्रशासनाकडून बचाव मोहीम राबविली जात आहे.
फुजैराह येथे २५५ मि.मि.पाऊस
फुजैराह येथे सर्वाधिक २५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्यांतील हा सर्वाधिक पाऊस मानला जात आहे. रास अल खेमाचे पोलिस प्रमुख मेजर जनरल अब्दुल्ला बीन अलवान अल नुयैमी म्हणाले, की पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांच्या सुमारे ७० हून अधिक गाड्या गस्त घालत आहेत. पर्वतीय क्षेत्रात आणि खोऱ्यातील पुरात अडकलेल्या सुमारे २०० जणांना पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी नेले आहे. गरजू लोकांना औषधी आणि खाद्यपुरवठा केला जात आहे.
Web Title: Weather Update Rain Forecast Seven Death Due To Heavy Rain In Uae
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..