आता फेसबुक डिलीट करायची वेळ आली आहे..

वृत्तसंस्था
बुधवार, 21 मार्च 2018

काही दिवसांपूर्वी कॅम्ब्रिज अॅनालिटिका या राजकीय माहिती विश्लेषक कंपनीने कोणतीही परवानगी न घेता पाच कोटी फेसबुक ग्राहकांचा डेटा चोरल्याचे निष्पन्न झाले.

नवी दिल्ली : फेसबुक वरील डेटा चोरी प्रकरणी आज व्हॉट्स‍अॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनी ट्विट करून भाष्य केले. त्यांनी ट्विटरद्वारे सगळ्यांना फेसबुक अकाऊंट डिलीट करण्याचे आवाहन केले. त्यांनी असेही सांगितले की, आता फेसबुक डिलीट करायची योग्य वेळ आलेली आहे. 

काही दिवसांपूर्वी कॅम्ब्रिज अॅनालिटिका या राजकीय माहिती विश्लेषक कंपनीने कोणतीही परवानगी न घेता पाच कोटी फेसबुक ग्राहकांचा डेटा चोरल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणानंतर फेसबुकच्या गोपनीयतेवर व विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. 

2014 मध्ये फेसबुकने व्हॉट्सअॅपला खरेदी केलं. त्यानंतर कॅम्ब्रिज ऍनालिटिका ही कंपनी फेसबुकशी जोडली गेली. पण ब्रायन अॅक्टन यांनी स्वतःची सिग्नल फाऊंडेशन ही कंपनी सुरू केल्यामुळे ते फेसबुक कंपनीच्या बाहेर पडले. 

2016 मध्ये झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॅम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांना मदत केली होती. या कंपनीने फेसबुकवरील पाच कोटी युजर्सची वैयक्तिक माहिती चोरली व या निवडणुकीत वापरली, असा आरोप करण्यात आला. या कंपनीने ग्राहकांचा डेटा चोरल्याचे कळल्यानंतर फेसबुकच्या शेअर्समध्ये सात टक्क्यांनी घसरण झाली. शेअर्स घसरल्याने फेसबुकला जवळपास 6.06 अब्ज डॉलरचे नुकसान झाले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp co-founder tweets It is time to delete Facebook