ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग कारवाई कोठे चालणार वाचा

पीटीआय
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

सरन्यायाधीश सहभागी होणार
ट्रम्प यांच्यावरील पहिला आरोप हा सत्तेच्या दुरुपयोगाचा असून, दुसरा महाभियोगावर सुनावणी होत असताना संसदेच्या कामकाजामध्ये व्यत्यय आणल्याचा आहे. आता सिनेटमध्ये महाभियोगावर सुनावणी होणार असून, त्यामध्ये सरन्यायाधीश जॉन रॉबर्टसदेखील सहभागी होणार असल्याने सभागृहाला न्यायालयाचे रूप येईल. अमेरिकेच्या इतिहासामध्ये असे होण्याची ही पहिलीच वेळ आहे. येत्या मंगळवारपर्यंत सिनेटमधील महाभियोगाची कारवाई सुरू होईल, असे सिनेटमधील सत्ताधारी पक्षाचे नेते मिच मॅक्कोनेल यांनी सांगितले.

वॉशिंग्टन  - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोगाची कारवाई आता अमेरिकी संसदेचे वरिष्ठ सभागृह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिनेटमध्ये चालणार आहे. तत्पूर्वी, ही सगळी प्रक्रिया संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये सुरू होती. याबाबत आज अमेरिकेच्या संसदेमध्ये मतदानही घेण्यात आले. ही सगळी प्रक्रिया वरिष्ठ सभागृहामध्ये चालावी या बाजूने २२८ संसद सदस्यांनी मतदान केले, तर १९३ सदस्यांनी याला विरोध केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे वर्चस्व आहे. हा ठराव मंजूर झाल्यानंतर अमेरिकेच्या प्रतिनिधी सभेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्यावर अधिकारांच्या गैरवापराबरोबरच अमेरिकी काँग्रेसच्याविरोधात कट केल्याचा ठपका ठेवला. ‘‘ही अत्यंत वाईट आणि दुर्दैवी बाब आहे, आमच्या अध्यक्षांनी देशाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करणारी कृत्ये केली आहेत. असे करूनच त्यांनी शपथेचाही भंग केला आहे, तसेच देशाच्या निवडणुकीची सुरक्षादेखील धोक्‍यात आणली आहे,’’ अशी खंत पेलोसी यांनी व्यक्त केली. हा ठराव मंजूर झाल्यानंतर पेलोसी यांनी या ठरावावर स्वाक्षऱ्या करण्यासाठी सदस्यांना खास पेनांचेही वाटप केले. आज सिनेटच्या चेंबरमध्येच ट्रम्प यांच्यावरील आरोपांचे सर्व सदस्यांसमोर मोठ्याने वाचन करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Where will the impeachment proceedings against Trump go