'चीनने कोरोना लपवण्याचा प्रयत्न केला, WHO सुद्धा या कटात सहभागी'

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 September 2020

कोरोना व्हायरस हा वुहानमधील एका सरकारी प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याचा दावा याआधीच करण्यात आला होता. आता डॉक्टर मेग यान यांनी चीनसह जागतिक आरोग्य संघटनेवर गंभीर आरोप केले आहेत.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या ससंर्गाबद्दल चीनमधील व्हायरॉलॉजीस्टने एक खळबळजनक खुलासा केला आहे. कोरोना व्हायरस हा वुहानमधील एका सरकारी प्रयोगशाळेत तयार करण्यात आल्याचा दावा याआधीच करण्यात आला होता. आता डॉक्टर मेग यान यांनी चीनसह जागतिक आरोग्य संघटनेवर गंभीर आरोप केले आहेत. डॉक्टर मेंग यांनी WION या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टी उघड केल्या. 

मेंग म्हणाल्या की, वुहानच्या लॅबमध्ये धोकादायक अशा कोरोना व्हायरसची निर्मिती करण्यात आली होती. तसंच कोरोना लोकांमध्ये वेगाने पसरत असल्याची कल्पना सरकारला होती. वुहानमध्ये जेव्हा पहिल्यांदा काही संसर्ग झालेले रुग्ण आढळले तेव्हा व्हायरसचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न केला होता. चीनने वुहान प्रकरण दाबण्यासाठी एक कव्हर अप ऑपरेशनही सुरु केलं होतं आणि चीनच्या सरकारला याबाबत माहिती होती असंही डॉक्टर मेंग यांनी म्हटलं आहे. 

हे वाचा - चीन प्रमुखांवर टीका करणं पडलं महागात; व्यावसायिकाला 18 वर्षांचा तुरुंगवास

जगभरातून चीननेच कोरोना पसरवला असल्याचा आरोप आतापर्यंत अनेक देशांनी केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेलासुद्धा चीन कोरोना व्हायरसला कव्हर अप करण्यासाठी धडपडत असल्याची माहिती होती. WHO सुद्धा या कटात सहभागी होते असं धक्कादायक वक्तव्य  मेंग यांनी केलं आहे. चीन सरकारने जगाची दिशाभूल करण्यासाठी कोरोना वुहानमधील बाजारातून सगळीकडे पसरला असं सांगितल्याचा दावा डॉक्टर मेंग यांनी केला.

चीन सरकार सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच सायबर अटॅक केला जात असून कुटुंबाला धमक्या दिल्या जात असल्याचं डॉक्टर मेंग यान यांनी म्हटलं आहे. याआधी 14 सप्टेंबरला डॉक्टर ली मेंग यान यांनी म्हटलं होतं की, कोरोना वुहानच्या प्रयोगशाळेत तयार केला आहे. डॉक्टर यान या हाँगकाँग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये कार्यरत होत्या. तिथं डॉक्टर यान कोरोना व्हायरसवर संशोधन करत होत्या. कोरोना व्हायरस चीनच्या लॅबमध्ये तयार करण्यात आल्याचं त्यांच्या संशोधनातून समोर आल्याचंही डॉक्टर मेंग यान यांनी सांगितलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WHO part of china attempt to cover up Wuhan virus