omicron : वाढत्या संसर्गामुळे ब्रिटन चिंतेत; ओमिक्रॉन ३८ देशांत पसरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाढत्या संसर्गामुळे ब्रिटन चिंतेत; ओमिक्रॉन ३८ देशांत पसरला
वाढत्या संसर्गामुळे ब्रिटन चिंतेत; ओमिक्रॉन ३८ देशांत पसरला

omicron : वाढत्या संसर्गामुळे ब्रिटन चिंतेत; ओमिक्रॉन ३८ देशांत पसरला

वॉशिंग्टन : कोरोना संसर्गाने ओमिक्रॉन व्हेरिएंटने ३८ देशांत एंट्री केली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना लागण होण्याचा वेग वाढला असून गेल्या चोवीस तासात ५० हजारांहून अधिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. यादरम्यान, या संसर्गामुळे जगभरात आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. ओमिक्रॉनची तीव्रता आणि लशीची परिणामकता याबाबत ठोस पुरावे हाती लागण्यासाठी काही आठवडे लागू शकतात, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले.

कॅनडात चोवीस तासात ओमिक्रॉनबाधित पंधरा जण आढळून आले. संसर्गात आणखी वाढ होऊ शकते, असा इशारा कॅनडाच्या आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. ५० पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना बूस्टर देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कॅनडा सरकारने परदेशातून येणाऱ्या नागरिकांची विमानतळावर चाचणी अनिवार्य केली आहे.

दक्षिण आफ्रिकेत मुलांत वाढतोय कोरोना

दक्षिण आफ्रिकेत मुलांना कोरोनाची बाधा होत आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, पाच वर्षापेक्षा कमी वयोगटातील मुलांना कोरोनाची सर्वाधिक बाधा होत असून हीच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंताजनक बाब आहे. त्याचबरोबर ६० पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना अधिक बाधा होत आहे. सद्यःस्थितीत बाधित मुले ही पाचपेक्षा कमी वयाची आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुलांवर फारसा परिणाम झाला नव्हता. आफ्रिकेत गेल्या चोवीस तासात १६०५५ जणांना बाधा झाली असून २५ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट महत्त्वाचा

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अमेरिकेत सोमवारपासून नवीन नियम लागू केले जात आहेत. आता अमेरिकेत आंतरराष्ट्रीय प्रवाशांना प्रवासाच्या चोवीस तास अगोदर कोविड चाचणी करावी लागेल आणि त्याचा निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक आहे. तसेच दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना सवलत दिली आहे.

ख्रिसमस पार्टीनंतर १३ जणांना ओमिक्रॉन

ओमिक्रॉनचा संसर्ग हा ३८ देशांत पसरला असला तरी आतापर्यंत या व्हेरिएंटचे गंभीर रूप समोर आलेले नाही किंवा वाईट बातमी देखील समोर आलेली नाही. नॉर्वेत गेल्या आठवड्यात ओस्लो येथे एका ख्रिसमस पार्टीनंतर किमान १३ जणांना ओमिक्रॉनची बाधा झाली. तसेच श्रीलंकेतही एक रुग्ण आढळून आला असून तो दक्षिण आफ्रिकेतून परतला होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, ओमिक्रॉन हा गंभीर आजाराचे कारण ठरू शकतो का? हे जाणून घेण्यास आणखी वेळ लागू शकतो.

बाधितांची संख्या ब्रिटनमध्ये १०४

ओमिक्रॉनमुळे जगभरात अस्वस्थता पसरली असून ठिकठिकाणी नव्याने निर्बंध लादले जात आहेत. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचे नवीन ७५ रुग्ण आढळून आल्याने एकूण ओमिक्रॉन बाधितांची संख्या १०४ झाली आहे. नवीन रुग्ण हे ईस्ट मिडलँडस, ईस्ट ऑफ इंग्लंड, लंडन, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, साऊथ ईस्ट, साउथ वेस्ट आणि वेस्ट मिडलँडस येथे आढळले आहेत. नवीन रुग्ण आढळलेल्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची सामूहिक चाचणी केली जात आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सावधगिरी बाळगण्याचा नागरिकांना सल्ला दिला आहे. सर्वांपर्यंत ओमिक्रॉन पोचणार नाही, यासाठी ब्रिटन सरकार प्रयत्नशील असून बूस्टर डोसचेही आवाहन केले आहे. ब्रिटनमध्ये चोवीस तासात ५०,५८४ जणांना कोरोनाची लागण झाली असून १४३ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Who Says Covid Omicron Variant Detected In 38 Countries Early Data Suggests Its More Contagious Than

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :whoomicronOmicron Variant
go to top